कर्जतमध्ये रेल्वेची ‘फोर्ट्रेस’ धडक, ३८२ फुकट्या प्रवाशांना दणका; पावणेदोन लाखांचा दंड वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विनातिकीट प्रवास करून नियम पायदळी तुडवणाऱ्या प्रवाशांना रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. फुकट्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कर्जत रेल्वे स्थानकावर ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम’ राबवली. एका दिवसात ३८२ प्रवशांवर कारवाई करून १ लाख ७४ हजार ३४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईसाठी रेल्वेने मोठा फौजफाटा तैनात केला होता.

लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी तिकीट तपासणी पथकाने ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहीम’ हाती घेतली. १८ तिकीट तपासणीस, ५ आरपीएफ जवान आणि वाणिज्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्जत स्थानकावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. यामध्ये ३८२ फुकट्या प्रवशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. द्वितीय श्रेणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २५६ प्रवाशांकडून १ लाख ३२ हजार ४४५ रुपये तर प्रथम श्रेणीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या ३० प्रवाशांकडून १७ हजार ५६५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

सुरक्षित प्रवास करा

विनाबुकिंग सामान घेऊन जाणाऱ्या ७३ प्रवाशांवरही कारवाई करण्यात आली. रेल्वे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणखी एका प्रवाशावर कारवाई केली. रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईमुळे तिकीट न घेता प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. केवळ दंड वसूल करणे हा उद्देश नसून प्रवाशांनी रेल्वेचे नियम पाळावेत आणि सुरक्षित, शिस्तबद्ध प्रवास करावा, यासाठी अशा मोहिमा राबवण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.