नालासोपाऱ्यात झेडपी शाळेत कुकरचा स्फोट; दोन विद्यार्थी गंभीर होरपळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नालासोपारा परिसरातील सोपारा जिल्हा परिषद शाळेत आज दुपारच्या सुमारास पोषण आहार बनवत असताना कुकरचा अचानक स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत दोन विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले असून जेवण बनवणारी महिलाही होरपळली आहे. दरम्यान या स्फोटाने संपूर्ण सोपारा गाव हादरले असून घाबरलेल्या पालकांनी शाळेत धाव घेत जखमी मुलांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास शाळेच्या परिसरात जेवण बनवण्याचे काम सुरू असताना अचानक कुकरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी जवळ असलेले दोन विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांची नावे आयुष चौधरी आणि प्रसाद गौतम अशी असून आयुष हा इयत्ता तिसरी तर प्रसाद हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना स्फोटात गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जेवण बनवणारी महिलाही या घटनेत होरपळली असून तिच्यावरही उपचार सुरू आहेत. कुकरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.