
अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ (‘दृश्यम ३’) या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
२ मिनिटे ५२ सेकंदांचा हा ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा विजय साळगावकर अडचणीत येताना दिसतोय. यावेळी त्याच्या विरोधात नवीन पुरावे पोलिसांना सापडले आहेत. त्यामुळे आपल्या कुटुंबाचे कित्येक वर्षांचे गुपित लपवून ठेवण्यासाठी तो पुन्हा एकदा धडपडताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. तसेच आतापर्यंत त्याला आयजी मीरा देशमुखसोबत लढावे लागत होते मात्र यंदा यात आणखी दोन दुश्मनांची भर पडली आहे. या तिसऱ्या भागात जयदीप अहलावत आणि ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांची एन्ट्री झाली असून, यामुळे विजयविरुद्धच्या तपासाला अधिक धार आल्याचे दिसते.
अस्तित्वाची लढाई
या वेळी विजय साळगावकरसमोर आधीपेक्षा कितीतरी मोठे संकट उभे ठाकल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते. सुरुवातीला केवळ बुद्धीची लढाई वाटणारा हा खेळ आता विजय आणि पोलिसांमधील जगण्या-मरण्याच्या संघर्षात बदलला आहे. स्वतः विजयही पोलिसांकडे ठोस पुरावे असल्याचे मान्य करतो. क्राइम ब्रँचचे एसपी म्हणून जयदीप अहलावत या प्रकरणाचा तपास करत असून, ते विजयची रणनीती आणि बुद्धिमत्ता चांगल्या प्रकारे ओळखून आहेत.
ट्रेलरमध्ये विजयचा उल्लेख ‘गोव्याचा सर्वात कष्टाळू गुन्हेगार’ असा करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांना चकवण्यात यशस्वी ठरलेल्या विजयचे जुने प्लॅन्स नव्या संकटांसमोर तग धरू शकणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली गेली आहे.



























































