
<< वैश्विक
[email protected]
एकदा एका खगोलीय कार्यक्रमासाठी एक वयोवृद्ध फ्रेंच खगोल अभ्यासक आले होते. कार्यक्रम झाला. त्यानंतर अनौपचारिक गप्पा सुरू झाल्यावर परताऱ्यांच्या ग्रहमालेत कुठे ‘जीवसृष्टी’ आहे का याची मनोरंजक चर्चा सुरू झाली. त्या वेळी ते अभ्यासक गमतीने म्हणाले, ‘‘परताऱ्यांच्या ग्रहांची गोष्ट राहू द्या. आपल्याला आपली सूर्यमाला तरी नीट समजलीय का? तेही जाऊ दे, आपली पृथ्वी आणि त्यावरच्या सूक्ष्मातिसूक्ष्म सजीवांची, झाडापानांची तरी पूर्ण ओळख आपल्याला पटलीय का?’’ यावर सर्वजण हसले नि तो विषय संपला.
पण मग विचार आला खरंच आपल्या ग्रहाला किंवा ग्रहमालेला तरी आपण पूर्ण जाणून घेतलंय का? आपला ग्रहसुद्धा त्यावरील सर्व नैसर्गिक बारकावे जाणून घेण्याइतका प्रचंड आहे की, बाकीच्या ग्रहांची जी नित्यनवी माहिती समोर येते त्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. कुतूहल मात्र वाटलं पाहिजे तरच नवे शोध लागतील. वैज्ञानिक चिकित्सा होत राहील.
आपला बाह्य शेजारी असलेल्या मंगळ ग्रहाची चर्चा आपण अधिक करतो. कारण आज ना उद्या तिथे जाऊन वस्ती करता येण्याचं आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे मंगळावरचा ग्रहमालेतला सर्वात उंच पर्वत ऑलिम्पस (एव्हरेस्टच्या अडीच पट उंच) पिंवा मंगळावरचे विशाल अशनी-आघात विवर तसेच मंगळाच्या ध्रुवीय क्षेत्रातलं गोठलेल्या बर्फातलं पाणी आणि मंगळपृष्ठावरचे अनेक ‘पॅटर्न’ आपल्याला मोहीत करतात. गॅलिलिओ गॅलिली यांना दुर्बिणीतून मंगळपृष्ठावरच्या ज्या दगडी घळी दिसल्या त्याला त्यांनी इटालियन भाषेत ‘कनाली’ म्हणजे चॅनेल (घळ) म्हटलं, पण त्याचा ‘पॅनॉल’ किंवा कालवा असा अर्थ लावत मंगळावरच्या जलस्रोतांची चर्चा सुरू झाली.
सध्या तरी मंगळपृष्ठावर पृथ्वीवर आहेत तशा पाण्याच्या नद्या नाहीत. समुद्रांचा तर प्रश्नच नाही, परंतु तिथे जायचं, जीवनावश्यक पाणी आणि पाण्यातल्या ऑक्सिजन-हायड्रोजनचं इंधन मिळवल्याइतपत तरी ‘पाणी’ आहे का याचा सतत शोध घेतला जातोय. मंगळावर ‘स्पायडरवेब’ रिंग्ज आणि ‘गीझर्स’ (फवारे) असल्याच्या वार्ताही येतात. यात कुठेही धो धो पाणी नाही, पण पाणी होतं का याचे ते अवशेष असू शकतात.
‘नासा’ या अमेरिकन अवकाश अभ्यास संस्थेच्या क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळावरच्या ‘गेल’ नावाच्या विवरात कोळ्याच्या जाळ्यासारखी भूपृष्ठीय रचना आढळली आहे. हे गेल क्रेटर मुळात कसं आहे? मंगळाच्या विषुववृत्ताच्या जवळच, पण तिथल्या दक्षिण गोलार्धात हे विवर साडेपाच दक्षिण अक्षांशावर आहे. त्याचा विस्तार सुमारे 150 किलोमीटर असून त्याचा बशीसारखा खोलगटपणाच साडेचार किलोमीटर भरतो. याचा अर्थ ती ग्रॅन्ड कॅन्यनपेक्षाही खोल दरीच म्हणावी लागेल.
या विवरात माऊंट शार्प (एओलिस मॉन्स) नावाचा 5 किलोमीटर उंचीचा पर्वत आहे. या विवराचं मॅपिंग 2012 च्या ऑगस्टमध्ये झालं. याचा माऊंट शार्पच्या उतारावर आता स्पायडरवेब पिंवा कोळ्याच्या जाळ्यासारख्या भूस्तरीय रचना आढळल्या आहेत. अवकाशातून त्याकडे पाहिलं तर ते एक विशाल आकाराचं मधमाशांचं पोळं किंवा कोळ्याचं जाळं असल्यासारखं दिसतं. अर्थात हे दगडधोंड्यांचे आकार (पॅटर्न) असून त्यात ‘जैविक’ भाग नाही. या ‘जाळ्यां’चा विस्तार 6 ते 12 किलोमीटर असून ती 3 ते 6 फूट सखोल आहेत.
यामागचं कारण काय? तर काही अब्ज वर्षांपूर्वी मंगळ हळूहळू शुष्क होत गेला. साहजिकच मंगळपृष्ठाला सूर्याच्या प्रखर उष्णतेने तडे जाऊ लागले. त्यामध्ये कधीकाळी मंगळतळाशी असलेलं पाणी त्यात शोषलं गेलं. त्या पाण्यातून त्यामध्ये जड धातू कार्बोनेट आणि चिखलासह मिसळून ते घट्ट होत गेले. लाखो वर्षांत घडलेल्या या प्रक्रियेला मंगळावरच्या तत्कालीन वाऱ्यांची जोड मिळाली. इरोजन किंवा पृष्ठीय धूप होत होत वाऱ्यांच्या दिशेनुसार त्या चिखलाचे आकार तयार झाले. वाळवंटात वाऱ्यामुळे ‘सॅन्ड ड्युन’ तयार होतात तसेच. तर तेही शुष्क, कठीण झाल्यावर केव्हातरी मंगळावरचं पाणी आणि वारा दोन्ही संपलं.
आता तिथे जलावशेष नाहीत, परंतु या कोळ्याच्या जाळ्यासारख्या संरचनेवरून असा कयास बांधता येतो की, पूर्वी अतिप्राचीन काळी मंगळावर पाणी होतं. असेच भूपृष्ठाीय पॅटर्न मंगळाच्या दक्षिण ध्रुवीय भागातही दिसतात. या भागात हिवाळ्यामध्ये कार्बनडायऑक्साइडचं बर्फ गोठतं. उन्हाळा सुरू झाला की, ते वितळून त्यातील वायू बाहेर पडतात आणि गीझर किंवा फवाऱ्यांसारखे उसळून वर येतात. बर्फाचे तट फोडून बाहेर पडलेला गॅस या भागातील जमिनीवर विविध आकार निर्माण करतो. या ‘गीझर्स’ची गती लय यातून एका विशिष्ट आकारातील पृष्ठभाग तयार होतो.
आता जेव्हा केव्हा आठ किंवा दहा इंची दुर्बिणीतून लाल मंगळाकडे पाहाल तेव्हा त्याच्या दोन्ही ध्रुवांवर बर्फाळ टोप्या (कॅप) दिसतील. त्या वेळी या स्पायडरवेब आणि गीझरचं स्मरण झालं तर उद्याचा आपला साथी मंगळ याचा अधिक परिचय होईल.


























































