
दहीहंडी उत्सवात जखमी झालेल्या तरुणाच्या उपचारावरून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पालघर पोलिसांकडून होत असलेल्या तपासातील दिरंगाईवर मुंबई उच्च न्यायालयाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणातील नऊ आरोपी अद्याप फरार असल्याने न्यायालयाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांना खडसावले. एवढेच नव्हे तर, “डोंबिवली प्रकरणातून धडा घेतला नाही का?” असा सवाल करत पोलिसांना जाबही विचारला.
६ जुलै रोजी डोंबिवलीत पालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला केल्याप्रकरणी शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करत न्यायालयाने सुओ मोटो (Sua Sponte) याचिका दाखल करून घेतली. आज बुधवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.
काल झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख हजर झाले होते. त्यांनी खंडपीठाला सांगितले की, एफआयआरमध्ये नाव असलेल्या दहा जणांपैकी शिंदे गटाचा शहरप्रमुख राहुल घरत याला अटक करण्यात आली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे, तर उर्वरित नऊ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाने “फरार आरोपींचा शोध घेण्यात दिरंगाई का? जलद कारवाई का नाही केली?” असे खडसावत पोलिसांना जाब विचारला.
-
या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार, असे खंडपीठाने विचारले. त्यावर, तातडीच्या बैठकीसाठी दिल्लीत असलेले महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या सूचनेनुसार पालघर प्रकरणाची संपूर्ण कागदपत्रे मागवून त्याची चौकशी केली जाईल, अशी माहिती सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
-
डोंबिवली प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून विशेष सरकारी वकील नेमण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने या प्रकरणातील प्रगतीबाबत राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले व या याचिकेवरील सुनावणी ११ सप्टेंबर रोजी ठेवली.
पोलिसांना झापले
एफआयआर दाखल झाल्यानंतर कोणताही तपास झालेला दिसत नाही. तुमच्या (पोलिसांच्या) हलगर्जीपणामुळेच आरोपी फरार आहेत. दुसऱ्या प्रकरणातून पोलिसांनी धडा घेतला नाही. ते आणखी एक प्रकरण घडण्याची वाट पाहत होते का? ते फरार आहेत असे आम्हाला स्पष्टपणे सांगितले जात आहे; यातून तुमची अकार्यक्षमता दिसून येते, अशा शब्दांत खंडपीठाने पोलिसांना झापले. एका संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी अगदीच निष्काळजी वृत्ती दाखवली, असेही खंडपीठाने पुढे म्हटले. त्यावर, फरार असलेल्या नऊ आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल अशी खात्री पोलीस अधीक्षकांनी खंडपीठाला दिली.
























































