
देशातील 90 टक्के भागात मान्सून बेपत्ता असून, राज्यातील तब्बल 30 जिल्हे कोरडेच आहेत. पावसाअभावी खरिपाची पिके हातून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. आता रब्बीवर मदार ठेवलेल्या बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.
राज्याच्या अनेक भागांत खरिपाची पिके उसळी घेत असतानाच पाऊस गायब झाल्याने त्यांनी माना टाकल्या. तर काही भागांत जमिनीत उगवणीपुरतीही ओल न झाल्याने पेरण्या झाल्याच नाहीत. अनेक ठिकाणी ढेकळेही फुटली नसल्याचे चित्र असून, कोरड्या दुष्काळाचे सावट राज्यापुढे उभे ठाकले आहे. तथापि, ही परिस्थिती 12 सप्टेंबरनंतर बदलेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केल्याने बळीराजाच्या आशा काहीशा पल्लवित झाल्या आहेत.
पुणे वेधशाळेतील शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी 12 ते 15 सप्टेंबर या कालावधीत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. तर ज्येष्ठ कृषी व हवामानतज्ज्ञांनी 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात चार ते पाच मोठे पाऊस होतील, असा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा एल-निनोच्या प्रभावासह इतर हवामान प्रणालींमुळे 1 जून ते 8 सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत 16 टक्के कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील सर्व आठ जिल्हे, विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमीच आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक वगळता इतर सर्व जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. पावसाने सरासरी न गाठल्याने राज्यातील तीस जिल्ह्यांत परिस्थिती बिकट आहे. शेतकऱ्यांना खरिपाला मुकावे लागले असून, पिण्याच्या पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. शेतकऱ्यांपुढे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असून, त्यांना जगवायचे कसे, या चिंतेने शेतकरी ग्रासले आहेत.
बाजारपेठांत सामसूम
डोळ्यांपुढे दुष्काळाचे चित्र दिसत असल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे. राज्यातील अनेक भागांतील बाजारपेठांमध्ये सामसूम असल्याचे विदारक चित्र आहे. मराठवाड्यातील पोळा (बैलपोळा) सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या सणाला बळीराजा आपल्या लाडक्या सर्जा-राजाचे भरभरून कौतुक करतो. यंदा मात्र पावसाने सताड पाठ फिरवल्याने बळीराजा निरुत्साही असल्याचे पाहावयास मिळत आहे.
























































