तुरुंगात 48 दिवसांत 21 किलो वजन घटले; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या 59 वर्षीय आरोपीचे 48 दिवसांत तब्बल 21 किलो वजन घटल्याने उच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली. 21 किलो वजन घटणे ही चिंताजनक आणि आरोग्यासाठी धोकादायक बाब असल्याचे स्पष्ट करत न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने वैद्यकीय कारणास्तव त्याला जामीन मंजूर केला. राधा मोहन मिश्रा असे या आरोपीचे नाव आहे.

धमकी आणि ब्लॅकमेलिंगच्या आरोपाखाली मिश्रा यांना जूनमध्ये अटक करण्यात आली होती. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीच्या अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. कोठडीत असताना मिश्रा यांना उलटी होणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे आणि प्रचंड थकवा अशा त्रासांना सामोरे जावे लागल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यांची वैद्यकीय स्थिती गंभीर असल्याबाबत न्यायालयाला कोणतीही शंका नसल्याचे न्यायमूर्ती जाधव यांनी स्पष्ट केले. मिश्रा यांना तुरुंगात किंवा तुरुंगातील रुग्णालयातच ठेवणे सुरू राहिल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने 2 लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

मिश्रा यांची 2025 मध्ये ‘स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी’ शस्त्रक्रिया झाली होती. या शस्त्रक्रियेत त्यांच्या पोटाचा सुमारे 80 टक्के भाग काढण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना द्रव किंवा तत्सम आहार घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र अटकेनंतर हा निर्धारित आहार घेणे शक्य न झाल्याने त्यांचे वजन झपाट्याने कमी झाले. त्यांची सध्याची वैद्यकीय परिस्थिती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे न्यायालयाने म्हटले.