
जुहू येथील प्रसिद्ध इस्कॉनच्या तीन आस्थापनांचे परवाने अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केले आहेत. छापेमारीदरम्यान इस्कॉनच्या खाद्य आस्थापनांमध्ये अस्वच्छता आणि कीटकांचा वावर असल्याचे निष्पन्न होताच प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली. एफडीएने राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित कारवाईत मुंबईतील सहा, कोकण विभागातील तीन आणि पुणे विभागातील ११ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत.
एफडीएने इस्कॉनच्या हरे कृष्णा लँड येथील मुख्य खाद्य आस्थापना, इस्कॉन जुहू फूड सर्व्हिसेस-रेस्टॉरंट आणि गोविंदाच रेस्टॉरंट या तीन खाद्य आस्थापनांवर छापेमारी केली. या कारवाईदरम्यान एफडीएच्या कर्मचाऱ्यांना तेथे कीटकांचा वावर, अन्नपदार्थांच्या साठवणुकीची अपुरी व्यवस्था, कच्चे व शिजवलेले अन्न वेगळे न ठेवणे, सांडपाण्यासाठी योग्य व्यवस्थेचा अभाव तसेच पाणी आणि अन्नपदार्थांची तपासणी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी यात त्रुटी आढळल्या. त्यानुसार एफडीएने विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. सुधारणेची गरज असल्याचे इस्कॉनने केले मान्य एफडीएने पाठवलेल्या अहवालात ७० टक्के व्यवस्था योग्य असून ३० टक्के सुधारणेची गरज असल्याचे नमूद केले आहे. सध्या सर्व रेस्टॉरंट्स बंद असून आम्ही सुधारणेसाठी प्रयत्न करत आहोत. एफडीएने दाखवून दिलेल्या सर्व त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न सुरू असून सर्व पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा परवाना मिळवण्याचा प्रयत्न करू.
-
गोकुळेश्वर दास, इस्कॉनचे उपाध्यक्ष, जुहू
























































