
चंद्रपूर शहरातील अतिव्यस्त आणि मध्यवर्ती प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात एका पुरुषाचे कापलेले शीर आढळल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या इंदिरा गांधी पुतळ्याच्या मागील बाजूस हे शीर आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. श्वानपथकाच्या मदतीने पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता, काही अंतरावर रेल्वे उड्डाणपुलाखाली जाहिरात फलकाच्या खांबाजवळ संबंधित पुरुषाचे धड आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू केली आहे.
संबंधित व्यक्तीची अन्यत्र हत्या करून मृतदेहाचे शीर आणि धड वेगवेगळे करून ते या परिसरात आणून टाकण्यात आले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण आणि घटनेमागील सत्य पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. शहराच्या अतिव्यस्त मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

































































