
थराराची परिसीमा गाठणाऱ्या सामन्यात अमेरिकेच्या बेन शेल्टनने गतविजेता आणि द्वितीय मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्काराजचा करेक्ट कार्यक्रम करीत यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तब्बल साडेचार तास रंगलेल्या या सामन्यात शेल्टनने टायब्रेकमध्ये 10-7 अशी बाजी मारत अल्काराजचा विजेतेपदाचा डाव उद्ध्वस्त केला. शेल्टनने 6-7, 6-1, 6-3, 1-6, 7-6 (10-7) असा विजय मिळवत आगेकूच केली.
पहिल्या सेटमध्ये टायब्रेकपर्यंत रंगलेल्या लढतीत अल्काराजने बाजी मारली, मात्र त्यानंतर शेल्टनने सामन्याची सूत्रे अक्षरशः हिसकावून घेतली. दुसरा सेट 6-1 आणि तिसरा सेट 6-3 असा जिंकत त्याने अल्काराजवर दबाव वाढवला. चौथ्या सेटमध्ये अल्काराजने 6-1 असा विजय मिळवत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे निर्णायक पाचव्या सेटमध्ये रंगत शिगेला पोहोचली. पाचव्या सेटमध्ये दोन्ही खेळाडू 6-6 अशा बरोबरीत पोहोचल्यानंतर सामना टायब्रेकमध्ये गेला. येथे शेल्टनने संयम आणि आक्रमक खेळाचा सुरेख मिलाफ साधत 10-7 असा विजय मिळवला आणि गतविजेत्याला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. उपांत्य फेरीत आता शेल्टनची गाठ फ्रान्सिस टियाफो याच्याशी पडणार आहे. टियापह्नेही पाच सेटच्या झुंजीत मिशेलसनचा 5-7, 3-6, 7-5, 6-3, 7-6 (10-6) असा पराभव केला. हा सामना तब्बल चार तास 38 मिनिटे चालला.
अल्काराजचे आठव्या ग्रॅण्डस्लॅमचे स्वप्न भंगले!
आठव्या ग्रॅण्डस्लॅम विजेतेपदाच्या निर्धाराने उतरलेल्या अल्काराजला मात्र उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनचे 2026चे विजेतेपद, फ्रेंच ओपनची दोन, विम्बल्डनची दोन आणि यूएस ओपनची दोन विजेतेपदे पटकावली आहेत, मात्र यंदा सलग दुसऱ्यांदा यूएस ओपनवर नाव कोरण्याचे त्याचे स्वप्न शेल्टनने धुळीस मिळवले.
पेगुलाला उपांत्य लढतीत सबालेंकाचे आव्हान
महिला एकेरीत अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत हमवतन एमा नवारोचा 3-6, 6-4, 6-3 असा पराभव केला. तब्बल दोन तास 21 मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर पेगुलाने सलग दोन सेट जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. यूएस ओपनमधील ही पेगुलाची सलग तिसरी उपांत्य फेरी असून, कोणत्याही ग्रॅण्डस्लॅममधील तिची ही चौथी उपांत्य फेरी आहे. आता तिच्यासमोर जगातील नंबर वन आणि दोन वेळची गतविजेती आर्यना सबालेंकाचे आव्हान असेल. सबालेंकाने लिंडा नोस्कोव्हाचा कडव्या लढतीत 7-6 (7-1), 3-6, 7-6 (9-7) असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे पेगुला आणि सबालेंका यांच्यातील सामना आणखी एका तुफानी लढतीची रंगत वाढविणार आहे.
























































