ब्रिक्समधून हिंदुस्थानला नेमका काय फायदा झाला? काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने अलीकडील ब्रिक्स शिखर परिषदांमधून नेमके काय साध्य केले, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. गेल्या दोन-तीन ब्रिक्स शिखर परिषदांमधून हिंदुस्थानला कोणतेही ठोस किंवा प्रत्यक्ष फायदे मिळालेले दिसत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, 2026 ची ब्रिक्स शिखर परिषद नवी दिल्ली येथे होणार असल्याने राजधानीत तयारीला वेग आला आहे.

चिदंबरम यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ब्रिक्सच्या आगामी शिखर परिषदेला किती राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत, याबाबतही प्रश्न उपस्थित केला. “गेल्या दोन-तीन ब्रिक्स शिखर परिषदांमधून ठोस फायदे किंवा ठोस परिणाम मिळाले आहेत, असे मला वाटत नाही,” असे त्यांनी म्हटले.

हिंदुस्थान हा ब्रिक्ससोबतच शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ), जी-20 आणि क्वाड या प्रमुख आंतरराष्ट्रीय संघटनांचाही सदस्य आहे. या विविध आंतरराष्ट्रीय गटांमधून भारताला नेमके कोणते फायदे मिळत आहेत, हे स्पष्ट होत नसल्याचे चिदंबरम यांनी नमूद केले. यापूर्वीच्या ब्रिक्स शिखर परिषदांमधून काही ठोस फायदे झाले होते; मात्र अलीकडील दोन-तीन परिषदांमधून तसे परिणाम दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील तयारीला वेग

ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये प्रशासनाने तयारी तीव्र केली आहे. दिल्ली महापालिकेचे आयुक्त संजीव खिरवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) प्रधान सचिव संदीप कुमार यांनी बुधवारी शिखर परिषदेचे आयोजनस्थळ तसेच भारत मंडपम परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी केली.

दोन्ही विभागांतील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित क्षेत्रांचे उपआयुक्त या पाहणीवेळी उपस्थित होते. खिरवार यांनी स्वच्छता आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. स्वच्छता तसेच अन्य अत्यावश्यक सेवांसाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

शिखर परिषदेच्या मार्गांवर, आयोजनस्थळी, लगतच्या परिसरात, बाजारपेठा, रस्ते, पदपथ, हरित पट्टे आणि अन्य संवेदनशील ठिकाणी विशेष स्वच्छता व देखभाल मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या मार्गांचीही पाहणी

पाहणीदरम्यान दक्षिण-पूर्व दिल्लीतील महत्त्वाच्या मार्गांचाही आढावा घेण्यात आला. सराय काले खान, लोधी रोड आणि निजामुद्दीन या मार्गांसह दक्षिण दिल्लीतील साकेत आणि शेख सराय परिसराचीही पाहणी करण्यात आली.

शिखर परिषदेच्या अंतिम टप्प्यातील तयारीसाठी पुरेशा संख्येने स्वच्छता कर्मचारी, यंत्रसामग्री आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.