
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी, मुंबई- गोवा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला होत असलेल्या प्रदीर्घ विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या कामाला विलंब होत असल्याने आपल्याला लाज वाटत असल्याचे ते म्हणाले. याच कारणामुळे महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पणजी येथील पोरवोरिम मध्ये त्यांनी बुधवारी सहा पदरी उन्नत मार्गाचे उद्घाटन केले यावेळी गडकरी बोलत होते.
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई-गोवा महामार्गाची ते आता ऑक्टोबरमध्ये स्वतः पाहणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मुंबई विमानतळापासून गोव्यापर्यंत प्रवास करून महामार्गाचे काम आणि प्रवासात काय सुविधा आहेत हेदेखील ते पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर कामासंदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक देखील झाली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. याच मुद्दयावर अधिक बोलताना गडकरी म्हणाले, पायाभूत सुविधा प्रकल्यापांच्या कामामध्ये विलंब किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
मुंबई-गोवा महामार्गाची लांबी 440 किलोमीटर असून, सदर महामार्गाच्या रूंदीकरणाला मुदतवाढ मिळाली आहे. जेथे काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी पहिल्याच पावसात खड्डे आणि रस्त्यांचे नुकसान देखील झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वळणमार्ग, तसेच पाणी साचणे, वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरुस्ती यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.



























































