गणेश आगमन मिरवणुकीत ड्रगनच्या देखाव्याला आग, साताऱ्यात मंगळवारी रात्री उडाला थरकाप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दणदणाटासह निघालेल्या गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीत लोकांचे लक्ष वेधून घेत असलेल्या भव्य ड्रगनलाच फटाक्यांच्या आतषबाजीमुळे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 8) रात्री सातारा शहरात घडली. हा आगडोंब उसळल्यावर क्षणात उत्साहाची जागा घबराटीने घेतली. आगीपासून दूर पळताना सर्वांचीच तारांबळ उडाली. नशिबाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या गणेश आगमनाच्या मिरवणुकीत शहरातील राजवाडा परिसरात हे थरारक अग्निकांड घडले. मंगळवारी साताऱयातील आझाद हिंद मंडळ, समता पार्क, नर्मदेश्वर, शिवतेज आणि सह्याद्रीचा राजा मंडळांच्या गणेशमूर्तीच्या आगमनाच्या मिरवणुका धुमधडाक्यात निघाल्या होत्या. राजवाडा बसथांबा हा मिरवणुकांचा केंद्रबिंदू असल्याने तेथे भाविकांची मोठी गर्दी जमली होती.

ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह निघालेल्या या मिरवणुकीत ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या हलत्या ड्रगनचा भव्य देखावा लोकांचे लक्ष वेधून घेत होता. त्यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मिरवणुकीतील हलत्या ड्रगनने अचानक पेट घेतल्याने भाविकांची एकच तारांबळ उडाली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने उपस्थितांमध्ये घबराट पसरली.

घटनेचे गांभीर्य ओळखून कार्यकर्त्यांनी तत्परता दाखवत आग लागलेल्या ट्रॉलीपासून ‘श्रीं’ची मूर्ती, जनरेटर आणि महागडी ध्वनियंत्रणा सुरक्षितरीत्या बाजूला हलवली. कार्यकर्त्यांनी बादल्यांतून पाण्याचा मारा सुरू केला, तर काही वेळातच नगरपालिकेचा अग्निशमन बंबही तेथे दाखल झाला. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. पोलिसांनी बघ्यांची गर्दी पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, यंदाच्या मिरवणुकांमध्ये ध्वनिवर्धकांच्या आवाजावर पोलिसांनी कडक नियंत्रण ठेवले होते. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिसांकडून ‘डेसिबल मीटर’द्वारे आवाजाची पाहणी केली जात असल्याने साऊंड ऑपरेटर्सवर पोलिसांचा चांगलाच वचक दिसून आला.