शेख हसिना यांच्या मुलीचा WHOच्या पदाचा राजीनामा, आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांची मुलगी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) विभागाचे प्रमुख सायमा वाजेद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. युएन (UN) आरोग्य संस्था आणि बांगलादेशी अधिकाऱ्यांमार्फत सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या चौकशीदरम्यान त्यांनी हा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

सायमा वाजेद यांनी 2024 च्या सुरुवातीला डब्ल्यूएचओच्या (WHO) प्रादेशिक संचालक म्हणून पाच वर्षांचा कार्यभार स्वीकारला होता. मागील वर्षापासून त्या सक्तीच्या बिनपगारी रजेवर होत्या. आर्थिक फसवणूक, शैक्षणिक पात्रतेतील त्रुटी आणि बांगलादेशमधील एका जमिनीच्या खरेदीसंदर्भातील गंभीर आरोपांनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांच्याकडे सायमा वाजेद यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा पत्रामध्ये त्यांनी आपल्याला प्रादेशिक संचालक म्हणून काम करण्यापासून रोखले गेल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. तसेच मागील जवळपास एक वर्षापासून वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याची खंत त्यांनी या पत्राद्वारे व्यक्ती केली आहे.

मार्च 2025 मध्ये बांगलादेशच्या भ्रष्टाचारविरोधी आयोगाने त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप दाखल केले होते. त्यानंतर जुलै 2025 मध्ये त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. चीन दौऱ्याशी संबंधित खर्चाबाबत आर्थिक फसवणूक आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा यांवरून त्यांच्यावर आरोप करण्यात आले. मात्र, वाजेद यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत प्रवासातील बाब ही केवळ प्रशासकीय चूक असल्याचे स्पष्ट केले. वाजेद यांनी जुलै 2026 मध्ये एका पत्राद्वारो WHO ला उत्तर देत आपल्यावरील आरोपांचे खंडन केले होते.