
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पैसे गुंतवण्याचे आवाहन करणारे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांचे एआय (AI-generated) फोटो आणि आवाज वापरून पसरवले जाणारे बनावट व्हिडिओ समोर आले आहेत. प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाने गुरुवारी नागरिकांना अशा व्हिडिओंपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच अशा ‘फसव्या’ पोस्ट्सची तक्रार करून त्यांना ब्लॉक करण्याचे आवाहनही केले आहे.
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये, प्रियंका गांधी यांच्या कार्यालयाने लोकांना अशा घोटाळ्यांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
‘प्रियंका गांधी वाड्रा जी यांचे एआय-निर्मित फोटो आणि आवाज वापरलेले बनावट व्हिडिओ व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत असून, त्याद्वारे लोकांना पैसे गुंतवण्यास सांगितले जात आहे. ही एक फसवणूक आहे. कृपया त्यावर क्लिक करू नका किंवा पैसे गुंतवू नका’, असे त्यांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
‘कृपया अशा पोस्ट्स रिपोर्ट आणि ब्लॉक करा’, असेही त्यात नमूद केले आहे.


























































