iPhone 18 लाँच होताच बॉयकॉटचे आवाहन, काँगोतील खनिजांच्या मुद्द्यावर टीम काँगोचा Apple विरोधात मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या iPhone बाजारात नुकताच लाँच झाला आहे. पण सोशल मीडियावर या फोनच्या फीचरपेक्षा त्यावर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू आहे. काँगोतील प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘टीम काँगो’ या समूहाने इन्स्टाग्रामवर ‘Why Boycott iPhone 18?’ या नावाने पोस्ट शेअर केली आहे. स्विडिशच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांनीही ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. मात्र, ग्रेटा यांनी स्वतःच्या वतीने Apple किंवा iPhone विरोधात कोणतेही स्वतंत्र विधान केलेले नाही.

नेमका काय आहे वाद?

‘टीम काँगो’च्या म्हणण्यानुसार, मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मितीसाठी कोबाल्ट आणि टॅंटलमसारख्या खनिजांचा वापर केला जातो. काँगो हा या खनिजांचा मोठा स्रोत आहे. या खनिजांच्या बेकायदेशीर व्यापारातून तेथील सशस्त्र गटांना आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप समूहाने केला आहे. त्यामुळे हिंसाचार, नागरिकांचे विस्थापन आणि बालमजुरीसारख्या समस्या वाढत असल्याचेही समूहाचे म्हणणे आहे.

काँगो हा जगातील कोबाल्टचा सर्वात मोठा उत्पादक आहे. टिन, टॅंटलम आणि टंगस्टन यांसारखी खनिजेही तेथे मोठ्या प्रमाणात आढळतात. या खनिजांचा वापर मोबाईल फोन, संगणक आणि बॅटरी तयार करण्यासाठी केला जातो.

ग्राहकांना काय आवाहन?

‘टीम काँगो’ने लोकांना इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीबाबत काही आवाहने केली आहेत. त्यात—

सध्याचा फोन शक्य तितका जास्त काळ वापरावा.
नवीन फोन घेण्याऐवजी गरज असल्यास जुना किंवा रिफर्बिश्ड फोन घ्यावा.
नवीन फोन खरेदी करण्यापूर्वी त्याची खरोखर गरज आहे का, याचा विचार करावा.
इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खनिजांच्या स्रोताबाबत प्रश्न विचारावेत.
गरजेपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे टाळावे.

समूहाने ‘Congo Accountability Network’ (CAN) या नावाने एक अभियानही सुरू केले आहे.

काँगोतील मृत्यू आणि विस्थापनाच्या आकडेवारीबाबत काय सत्य?

‘टीम काँगो’च्या पोस्टमध्ये काँगोमध्ये गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षात 1.5 कोटींपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या आकडेवारीची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.

Appleचे काय म्हणणे आहे?

Appleच्या म्हणण्यानुसार, कंपनीने आपल्या पुरवठादारांना काँगो आणि शेजारील रवांडामधून खनिजे खरेदी करण्यास प्रतिबंध करणारे निर्देश दिले आहेत. कंपनीच्या अहवालानुसार, 31 डिसेंबर 2025 पर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार काँगो किंवा रवांडामधील सशस्त्र गटांना फायदा पोहोचेल, अशा पद्धतीने खनिजांचा व्यापार करणारा कोणताही व्यापारी आढळलेला नाही.

दरम्यान, Appleविरोधात काही कायदेशीर प्रकरणेही सुरू आहेत. डिसेंबर 2024 मध्ये काँगो सरकारच्या वकिलांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये Appleच्या युरोपीय कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. फ्रान्समधील प्रकरण पुराव्यांच्या अभावामुळे बंद करण्यात आले, तर बेल्जियममध्ये चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेतील International Rights Advocates या संस्थेनेही Appleविरोधात खटला दाखल केला. कंपनीच्या पुरवठा साखळीत बालमजुरी आणि सशस्त्र गटांशी संबंधित असल्याचा आरोप असलेली खनिजे असल्याचा दावा या प्रकरणात करण्यात आला आहे.

यापूर्वीही iPhone बहिष्काराची हाक

नवीन iPhone आणि काँगोतील खनिजांचा संबंध जोडत Appleविरोधात बहिष्काराचे आवाहन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2024 मध्ये iPhone 16 लाँच होताना ‘टीम काँगो’ने अशाच प्रकारे बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यानंतर 2025 मध्ये iPhone 17 लाँचच्या वेळीही काँगोशी संबंधित संघटनांनी लंडनमधील Apple Storeबाहेर आंदोलन केले होते.