
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “मध्य प्रदेशातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माणसांच्या जीवाची कोणतीही किंमत उरलेली नाही. जेव्हा जनता न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरते, तेव्हा त्यांना सरकारच्या वतीने वॉटर कॅनन आणि अश्रुधुराचे गोळे मिळतात,” अशी टीका खरगे यांनी केली आहे. X वर पोस्ट करत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.
सागर जिल्ह्यातील बांदा परिसरात विषारी दारू पिल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण अद्याप मृत्यूशी झुंज देत असल्याचे खरगे म्हणाले आहेत. या दुर्घटनेमुळे ३१ कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून कोणाचा मुलगा, कोणाचा पिता तर कोणाचा पती हिरावला गेला आहे. मात्र गेल्या २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारसाठी ही केवळ आणखी एक सामान्य दुर्घटना ठरली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
मध्य प्रदेशात विषारी दारू, अशुद्ध पाणी आणि निकृष्ट औषधांमुळे निष्पाप लोकांचा बळी जाणे हे प्रशासनाचे पूर्ण अपयश असल्याचे खरगे यावेळी म्हणाले.


























































