
हिटमॅन रोहित शर्मा म्हणजे हिंदुस्थानातील हजारो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. मात्र, आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा खेळणार का नाही? हा प्रश्न रोहितच्या चाहत्यांना भेडसावू लागला आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा सध्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळताना दिसत आहे. त्यामुळे संघाला त्याच्याकडून अपेक्षा असून एकदिवसीय विश्वचषकाच्या टीममध्ये तो असावा, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
रोहित शर्मा 2027 एकदिवसीय विश्वचषक खेळणार का नाही? असा प्रश्न त्याला विचारला असता. त्याने आपली भूमीक स्पष्ट केली आहे. तो म्हणाला, “सध्या यावर भाष्य करणे फार घाईचे ठरू शकते. ऑक्टोबर 2027 ला अजून वेळ आहे, त्यामुळे त्याबद्दल तेव्हाच बघू.” असं त्याने ग्लोबल फिनटेक फेस्ट दरम्यान बोलताना सांगितलं. रोहितच्या या उत्तरामुळे आता चाहत्यांची दाखदुख वाढली आहे. मात्र, त्याने आपली सहभागाची दारे पूर्णपणे बंद केलेली नाहीत, ज्यामुळे त्याच्या खेळण्याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. दरम्यान, 2027 मध्ये रोहित शर्मा 40 वर्षांचा होणार असल्यामुळे निवडकर्ते त्यांच्या भविष्याबाबत विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र बीसीसीआयने अशा सर्व अफवांचे खंडन केले आहे.
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्माच्या कामगिरीचे कौतुक करताना तो उत्कृष्ट खेळत असल्याचे म्हटलं आहे. रोहितने आतापर्यंत हिंदुस्थानासाठी 288 वनडे सामन्यांमध्ये 34 शतकांच्या मदतीने 11895 धावा केल्या असून, विश्वचषक इतिहासात सर्वाधिक शतके आणि षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.





























































