पॅकेज सोडलं अन् पॅशन निवडलं! ॲमेझॉन इंजिनिअरचा लेफ्टनंटपर्यंतचा थक्क करणारा प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजच्या युगात तरुणाई कॉर्पोरेटच्या सुखासिन जीवनशैलीच्या मागे धावत असतानाच देशसेवेच्या पॅशनसाठी लाखोंचे पॅकेज सोडून शारदेंदू तिवारीने इतिहास रचला आहे. अ‍ॅमेझॉनमध्ये क्लाउड इंजिनिअर असलेल्या 27 वर्षीय शारदेंदूने, 46 लाख रुपयांचा वार्षिक पगार आणि एअरबससारख्या जागतिक एरोस्पेस कंपनीची नोकरीची ऑफर सोडून हिंदुस्थानी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.

लखनौचे रहिवासी असलेल्या शारदेंदू तिवारीचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होते. शारदेंदूचे वडील, राज कुमार तिवारी हे लष्कराच्या आर्मी सर्व्हिस कॉर्प्समध्ये 36 वर्षे सेवा बजावत मानद कॅप्टन म्हणून निवृत्त झाले. लहानपणापासून वडिलांना लष्करी गणवेशात पाहून शारदेंदूच्या मनात सैन्यात भरती होण्याची इच्छा निर्माण झाली. त्याने आपले प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालयात पूर्ण केले आणि त्यानंतर देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्था, पीईसी, चंदीगड येथून पदवी प्राप्त केली.

अभियांत्रिकीनंतर शारदेंदू अ‍ॅमेझॉनमध्ये क्लाउड इंजिनिअर बनला आणि त्याला 46 लाख रुपये पगाराचे वार्षिक पॅकेज मिळाले. त्यानंतर जागतिक एरोस्पेस क्षेत्रातील दिग्गज कंपनी एअरबसने त्याची निवड केली. पण लष्करी गणवेश परिधान करण्याचा त्याचा निर्धार अढळ होता. लष्करी अधिकारी बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता, त्यात अनेक अडथळे होते. मात्र हार न मानता शारदेंदूने चिकाटी, मेहनत आणि अढळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण केले.

ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए), गया येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला हिंदुस्थानी सैन्य दलात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. आपल्या नेतृत्व आणि शिस्तीमुळे, प्रशिक्षणादरम्यान त्याने अकादमीमध्ये सिनियर अंडर ऑफिसर हा प्रतिष्ठित दर्जा प्राप्त केला. शारदेंदू तिवारीची कहाणी तरुणांसाठी एक उत्तम उदाहरण आहे.