
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. सलग दोन दिवस भरवस्तीत पाळीव गाईंवर हल्ले झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कळंबस्ते हाक्रवणे आणि कळंबस्ते मोहल्ला परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यांमध्ये एका गाईचा मृत्यू झाला असून, दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे.
बुधवारी रात्री कळंबस्ते हाक्रवणे येथे शांताराम सनगरे यांच्या घराशेजारी बांधलेल्या गाईवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात सनगरे यांची गाय गंभीर जखमी झाली. घराच्या अगदी जवळ बिबट्याने हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटे कळंबस्ते पुलाजवळील मोहल्ला परिसरात पुन्हा बिबट्याने पाळीव गाईवर हल्ला केला. येथील रहिवासी अहमदअली दसुरकर यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला चढविल्याने गाईचा मृत्यू झाला. सलग दोन दिवस भरवस्तीत बिबट्याने हल्ले केल्याने ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रात्री तसेच पहाटेच्या वेळी बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक, महिला, लहान मुले तसेच शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. पाळीव जनावरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे पशुपालकांमध्येही चिंता वाढली आहे. वनविभागाने या घटनांची तातडीने दखल घेऊन कळंबस्ते परिसरात बिबट्याचा शोध घ्यावा, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तत्काळ मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























































