सज्ञानांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार, तरुणीच्या संन्यास घेण्याच्या निर्णयावर न्यायालयाची टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुटुंबाचा विरोध झुगारून संन्यासाचा मार्ग निवडणाऱ्या तरुणीला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सज्ञानांना स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती संदीप एन. भट्ट यांनी 20 वर्षीय तरुणीच्या निर्णयाबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला.

मध्य प्रदेशातील एका 20 वर्षीय श्वेतांबर या तरुणीने जैन धर्म स्वीकारून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या या निर्णयाला कुटुंब आणि नातेवाईकांनी विरोध केला. यामुळे तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली. संन्यासिनी होण्याच्या निर्णयाला विरोध करत आई-वडील आणि नातेवाईक आपला छळ करत असल्याचा आरोप तरुणीने केला. याचिकेत तात्काळ पोलीस संरक्षणाची मागणीही केली आहे.

श्वेतांबराच्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप एन. भट्ट यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने सज्ञानांचे अधिकार अधोरेखित करत तरुणीच्या बाजूने निकाल दिला. 20 वर्षीय याचिकाकर्ता हिंदुस्थानची नागरिक असून तिला आपल्या आवडीच्या धर्माचे पालन करण्याचा आणि आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा हक्क आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.