
<< डॉ. अनंत पावसकर
उत्सव आणि आनंद साजरा करणे चुकीचे नाही, परंतु तो इतरांच्या जिवावर बेतणारा नसावा. ‘डीजे’च्या मर्यादित आवाजाबाबत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आणि स्वतःहून जागरूकता निर्माण करणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा 75 डेसिबल ठरवून देण्यात आली आहे. गणेशोत्सवात सर्वत्र फक्त एकाच गोष्टीची चर्चा रंगते…‘डीजे’! पण ज्या डीजेच्या तालावर लोक नाचतात त्याचं मूळ नाव ‘DJ’ नसून भलतंच काहीतरी आहे.
सध्या पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि डॉल्बी स्पीकर्सच्या प्रचंड भिंतींवरून मोठा वाद पेटला आहे. लेझर लाईट्स आणि छातीत धडधड करणाऱ्या बेसवर रात्ररात्रभर तरुणाई बेभान होऊन नाचते. गणेशोत्सवात सर्वत्र फक्त एकाच गोष्टीची चर्चा रंगते…‘डीजे’! पण ज्या डीजेच्या तालावर लोक नाचतात त्याचं मूळ नाव ‘DJ’ नसून भलतंच काहीतरी आहे, हे ऐकून अनेकांना नवल वाटेल. हा शब्द कुठून आला आणि याचा खरा अर्थ काय, ते जाणून घेऊ या.
ज्याप्रमाणं घोडदौडीच्या मैदानात वेगानं पळणाऱ्या घोड्याला कौशल्यानं नियंत्रित करणाऱ्या स्वाराला ‘जॉकी’ (Jockey) म्हणतात, अगदी त्याचप्रमाणं जुन्या काळात प्लॅस्टिकच्या गोल फिरणाऱ्या तबकड्यांवरून (Vinyl Records) गाण्यांचा वेग आणि ताल अचूकपणे हाताळणाऱ्या कलाकारालाही हेच विशेष नाव देण्यात आलं. जुन्या काळातील प्लॅस्टिकच्या डिस्क (तबकड्या) कालबाह्य झाल्या आहेत. त्यांची जागा आता अत्याधुनिक लॅपटॉप्स, पेन ड्राईव्ह, सॉफ्टवेअर्स आणि डिजिटल मिक्सर्सनी घेतली आहे. तरीही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही कला आणि ते ऐतिहासिक नाव आजही जगभरात तसेच टिकून आहे.
जुन्या काळात गाणी ज्या प्लॅस्टिकच्या गोल फिरणाऱ्या तबकडीवर असायची, त्याला ‘डिस्क’ म्हटले जायचे. या डिस्कला आपल्या कौशल्यानं हाताळून, गाणी मिक्स करून लोकांना अखंड नाचवणाऱ्या व्यक्तीला ‘जॉकी’ म्हटले गेले. या दोन शब्दांच्या संयोगातूनच संगीताच्या दुनियेतील सर्वात मोठी ओळख निर्माण झाली. आपण ज्याला सहज ‘डीजे’ म्हणून हाक मारतो, त्याचे खरे पूर्ण नाव ‘डिस्क जॉकी’ (Disc Jockey) असे आहे! ‘डीजे’ हा केवळ या दोन शब्दांचा शॉर्टफॉर्म आहे. म्हणजेच तबकड्या कौशल्यानं हाताळून माहौल तयार करणारा कलाकार म्हणजे डिस्क जॉकी.
सध्याच्या काळात लग्नकार्य, सण-उत्सव आणि वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये ‘डीजे’ लावणे ही एक फॅशन बनली आहे. मात्र, मनोरंजनाच्या नावाखाली वाजवला जाणणारा हा डीजे अनेक गंभीर आजारांना आणि शारीरिक त्रासांना कारणीभूत ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, मानवी कानांसाठी 70 डेसिबलपर्यंतचा आवाज सुरक्षित मानला जातो, परंतु डीजे आणि मोठ्या साऊंड सिस्टीमचा आवाज अनेकदा 120 ते 150 डेसिबल किंवा त्याहून अधिक असतो, जो थेट मृत्यूलाही आमंत्रण देऊ शकतो.
डीजेच्या या अमर्याद आवाजामुळे मानवी शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर आजार व त्रास यावर ‘तज्ञ’ मंडळींनी ‘इंटरनेट’वर अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे ः
श्रवणशक्तीला कायमचा धोका ः मोठ्या आवाजाचा सर्वात पहिला आणि मोठा फटका आपल्या कानांना बसतो. अतितीव्र आवाजामुळे कानाच्या पडद्यावर प्रचंड दाब येतो आणि कानातील श्रवणाशी संबंधित नसा हळूहळू कमकुवत होतात. यामुळे तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. तसेच कानात सतत शिटी वाजल्यासारखा किंवा मधमाश्या गुणगुणल्यासारखा आवाज येणे, ज्याला वैद्यकीय भाषेत ‘टिनिटस’ म्हणतात, हा गंभीर आजार जडू शकतो.
हृदयविकाराचा धोका ः डीजेच्या बेसचा दणदणाट थेट छातीत धडधड निर्माण करतो. तीव्र आवाजामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब अचानक वाढतो आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होतात. कानाची जी नस हृदयाला जोडलेली असते, ती या मोठय़ा आवाजामुळे उत्तेजित होते. नाजूक हृदय असलेल्या व्यक्तींना किंवा अगदी तरुणांनाही यामुळे ‘सायलेंट हार्ट अटॅक’ किंवा ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (हृदयक्रिया बंद पडणे) येण्याचा धोका प्रचंड वाढतो.
मानसिक ताण ः कर्कश आवाजामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. यामुळे मानसिक आरोग्य बिघडून तीव्र चिडचिड, अस्वस्थता, एकाग्रता भंग होणे आणि मानसिक ताण (Stress & Anxiety) वाढतो. सतत अशा वातावरणात राहणाऱ्या लोकांमध्ये नैराश्याची (Depression) लक्षणेही दिसून येतात.
मेंदूवर आघात ः अतितीव्र डेसिबलचा आवाज थेट मेंदूच्या नसांवर आघात करतो. यामुळे तीव्र डोकेदुखी आणि अचानक चक्कर येणे यांसारखे त्रास उद्भवतात. काही अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, डीजेच्या अतिधक्क्याने मेंदूतील रक्तवाहिनी फुटून ‘ब्रेन हॅमरेज’ (Brain Haemorrhage) झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
घातक परिणाम ः गर्भवती महिला जर दीर्घकाळ डीजेच्या मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्या तर गर्भातील शिशूच्या श्रवणशक्तीवर जन्माआधीच वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच तीव्र मानसिक तणावामुळे गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो. लहान मुलांच्या नाजूक कानांना आणि मेंदूलाही हा आवाज सहन होत नाही.
उत्सव आणि आनंद साजरा करणे चुकीचे नाही, परंतु तो इतरांच्या जिवावर बेतणारा नसावा. साऊंड सिस्टीमच्या मर्यादित आवाजाबाबत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे आणि स्वतःहून जागरूकता निर्माण करणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सवांमध्ये आवाजाची मर्यादा 75 डेसिबल ठरवून देण्यात आली आहे.
गणेशोत्सवासारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह महाराष्ट्रातील काही भागांत अतिरिक्त ध्वनिप्रदूषण व सुरक्षिततेच्या कारणास्तव ‘डीजे’ किंवा ‘लेझर लाईट्स’वर कडक निर्बंध किंवा बंदीचे निर्णय घेण्यात आले आहेत. पोलिसांकडून आवाजाची मर्यादा तपासण्यासाठी विशेष यंत्रे वापरली जातात आणि 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज आढळल्यास कठोर कारवाई केली जाते, असे नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिल्या कारवाईमध्ये स्पष्ट केले आहे.
(लेखक ज्येष्ठ संगीत विश्लेषक आहेत.)


























































