
आता सुट्टी नाही, आम्ही मुंबईला जाणारच. मराठा मोर्चा धडकणारच, अशी ठाम भूमिका मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आज जाहीर केली. अंतरवाली सराटीत येत्या 12 सप्टेंबर रोजी मराठा बांधवांची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईत कधी जायचे त्याची तारीख ठरणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गेल्या 13 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला फारसे यश आलेले नाही. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत मुंबईत निर्णायक आंदोलन करण्याची घोषणा जरांगे यांनी याआधीच केली आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या तीन वर्षांत कोणी माझ्याकडे येईल, अशी अपेक्षा मी ठेवलेली नाही. मी माझ्या हिमतीवर आंदोलन करत असतो. माझं कर्तव्य मी पार पाडत आहे. मी लढायचं ठरवलं आहे. आता थांबायचं नाही. सरकारला मार्गदर्शकाचं मार्गदर्शन गरजेचं आहे की तोडगा हे त्यांना कळेल.
कुणबी प्रमाणपत्रासाठी 17 सप्टेंबरपर्यंत शिबीर
जालना जिह्यात जिथे जिथे कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत त्या ग्रामपंचायतींवर नोंदी चिकटवल्या आहेत. कुणबी जातीसाठी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज केल्यानंतर कूळ सिद्ध करता आले पाहिजे. त्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी जिह्यात 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिली.
भाऊबीजेला नक्कीच बहिणीकडे जेवायला जाऊ
बहिणीने जेवायला बोलावले आहे तर भाऊबीजेला नक्कीच साडी-चोळी घेऊन बहिणीकडे जेवायला जाऊ, पण आता आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांनी आता बोलावू नये. भाऊ संकटात पडेल असे बहिणीने करू नये, असे जरांगे अमृता फडणवीस यांच्या जेवणाच्या निमंत्रणावर बोलताना म्हणाले.
उपोषण संपेपर्यंत दारू विक्री बंद – जिल्हाधिकारी
कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास प्रशासन तयार आहे. पण वाईट परिस्थिती निर्माण व्हायला नको, सर्वजण सुरक्षित असावेत अशी प्रत्येकाची इच्छा आहे. जरांगे यांचे उपोषण संपेपर्यंत अंतरवाली सराटी येथे दारू विक्री बंद राहणार असल्याचे जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जाहीर केले. अंतरवालीत काही मुली शाळेत जात नाहीत. तिथे गर्दी आहे, लोक आहेत. अंतरवालीत असताना माझ्याकडे काही महिला आल्या होत्या. तिथे अनधिकृत दारू विक्री होते अशी तक्रार आल्याचेही त्यांनी सांगितले.
सरकारचे शिबीर नेमके कशासाठी?
सरकार गुन्हे दाखल करणार आहे, त्याला आपण घाबरायचे नाही. जसे दिवस येतील तसा संघर्ष करावा लागतो. सरकारचे शिबीर नेमके कशासाठी आहे? केवळ आंदोलनापुरतेच हे शिबीर आहे की दिलेले प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे हे दोन दिवसांत कळेल, असे जरांगे म्हणाले.





























































