
<< साधना गोरे
[email protected]
खरे तर सण-उत्सव आणि ढोल-ताशे यांचं एक सुमधुर नातं आहे, पण सध्या स्वतःचा आवाज दुसऱ्यापेक्षा अधिक मोठा करण्याच्या प्रयत्नात हे नातं दिवसेंदिवस कर्कश होऊ पाहत आहे. सण-उत्सव हे आनंद लुटण्यासाठी, एकमेकांमध्ये स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी आहेत, तर मग ते कर्कश आवाजात साजरे करून आपण ध्वनी प्रदूषणाखेरीज काय मिळवणार आहोत, याविषयी सध्या समाजमाध्यमांवर बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे.
सध्या ढोल, नगारा, ताशे इ. वाद्ये सण-उत्सवात व मिरवणुकात मोठ्या प्रमाणात वाजवली जात असली तरी पूर्वीच्या काळी रणधुमाळीत सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांचं वादन होई. ढोलाच्या प्रचंड आणि गंभीर नादामुळे सैनिकांच्या अंगात वीरश्री संचारत असे. शत्रू सैन्याचं मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यासाठीही ढोल वाजवले जात.
अशा या ढोलाचं संस्कृतमध्येही ‘ढोल’ असंच रूप आहे. कृ. पां. कुलकर्णी यांच्या मते, ‘ढोल’ शब्द परकी असून त्याचं संस्कृतीकरण नंतर झालं असावं. प्राकृतमध्ये ‘ढोल्ला’ आणि बंगाली, उडीया, हिंदी, पंजाबी, गुजराती या भाषांमध्येही ‘ढोल’ हेच रूप आहे. ढोलाच्या आकारावरून त्याची वेगवेगळी नामकरणं झालेली दिसतात. ढोल दोन्ही बाजूंनी बंद आणि दंडगोलाकार असतो. ढोलाचा आवाज गंभीर, खोल आणि भारदस्त असतो. नगारा अर्धगोलाकार असून ढोलापेक्षा आकाराने खूप अवाढव्य असतो. नगारा जमिनीवर किंवा विशिष्ट स्टँडवर ठेवून दोन मोठ्या काठ्यांनी फक्त एकाच बाजूने वाजवला जातो. याउलट ढोल हा दोन्ही बाजूंनी वाजवता येतो. ढोल गळ्यात अडकवून किंवा कमरेला बांधून हाताने आणि काठीने वाजवला जातो, तर ढोलापेक्षा लहान असते ती ढोलकी. ढोलकी प्रामुख्याने दोन्ही हातांच्या पंजांनी आणि बोटांनी वाजवली जाते.
ढोल, ढोलकी आणि नगारा या वाद्यांच्या स्वरूपात वरीलप्रमाणे फरक असला तरी या तिन्हींमधील एक महत्त्वाचं साम्य म्हणजे ती आतून पोकळ असतात. त्यांच्या या वैशिष्ट्यांना अधोरेखित करणारे बरेच शब्दप्रयोग आहेत. ढोलाच्या पोकळपणामुळे झाड, टेकडी, जमीन यांमध्ये बिळ असल्यास त्यालाही ‘ढोल’ म्हणतात. तसंच झाडाच्या बुंध्यात किंवा मोठ्या फांदीत पोकळी असेल तर तिला ‘ढोली’ म्हटलं जातं, तर वठलेल्या पोकळ झाडाला ‘ढोलार’ म्हणतात. ढोल वाजवणाऱ्याला ‘ढोल्या’ म्हटलं जातं, पण मोठ्या पोटाच्या व्यक्तीला गमतीने ‘ढोल्या’, ‘ढेरपोट्या’ सर्रास म्हटलं जातं. अशा व्यक्तीला ‘नगारा’ही म्हटलं जातं. धान्य साठवण्याच्या मोठ्या कणगीला काही भागांत ढोल म्हणतात, तर कणगी लहान असेल तर ढोली म्हटलं जातं. गणपती बाप्पाचं पोट मोठं असतं, पण काही मूर्तींमध्ये ते विशेषत्वानं मोठं दाखवलेलं असतं. सातारा, वाई, नाशिक या ठिकाणची ढोल्या गणपतीची मंदिरं प्रसिद्ध आहेत.
हल्ली सण-उत्सवच काय एखादा पोलिसात किंवा तत्सम खात्यात भरती झाला तरी ढोल वाजवले जातात, पण असं ढोल वाजवण्याला आपल्याकडे स्तोम माजवणं, बडेजाव करणं मानलं जातं. त्याला ‘ढोल किंवा ढोलके पिटणे/वाजणे’ असा शब्दप्रयोग वापरला जातो. ढोलाप्रमाणे ढोलके पोकळ असते. ते फोडणे म्हणजे जणू आतली गुप्त गोष्ट उघड करणे. यासाठी ‘ढोलके फोडणे’ असा वाक्प्रचार आहे. ढोलकीला दोन तोंडं असतात, यावरून दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या मनुष्याला ‘डबल ढोलकी’ म्हणण्याची पद्धत आहे. ढोलकीच्या दोन तोंडामुळे तिला दोन्हीकडून थापटतात, त्याप्रमाणे दुतोंडी मनुष्य दोघांना खूश करण्याचा प्रयत्न करतो, पण शेवटी त्यास दोघांकडूनही दोष मिळतो. अशा परिस्थितीत ‘ढोलक्यास दोन्हीकडून थापा/थोबाडी’ ही म्हण लागू पडते.
ढोल टिपऱ्यांनी म्हणजे दंडाने वाजवला जातो. यावरून ‘उंदाराला मांजर साक्षी’ या म्हणीप्रमाणे ‘ढोलाला साक्षीदार दंडा’ ही म्हण आहे. ढोलाच्या पृष्ठभागावर टिपरीचा जबर आघात होऊन आवाजनिर्मिती होते. यावरून अकस्मात जबरदस्त आर्थिक नुकसान किंवा इतर काही तोटा झाला तर ‘ढोला बसला’ म्हटलं जातं. कुणी फसवणूक, विश्वासघात केला तर ‘ढोला देणे’ हा वाक्प्रचार वापरला जातो. उदा. पावसाने ढोला दिला. हा शब्दप्रयोग ढोलाचा पोकळपणा अधोरेखित करतो.
संत एकनाथांचं एक प्रसिद्ध भारूड आहे – ‘सोहं सोहं वाजे ढोल। आमचा युगायुगीचा खेळ। परब्रह्म भुलले अकळ। या खेळाचे गुरू जाणे मूळ?’ सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा माणसाला समजते की, आपल्या शरीरात वाजणारा श्वास हाच परब्रह्माचा ‘सोहं’ नाद आहे, तेव्हा तो या युगान्युगे चालणाऱ्या जगातील मायेच्या खेळातून मुक्त होऊन आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. हे सोहं सोहं बोल ऐकण्यासाठी बाह्य ढोलाची काय गरज, असंच जणू नाथांना सुचवायचं असावं!


























































