
पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर पूर्व विभागाने यंदाच्या दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरले. दक्षिण विभागाविरुद्धचा अंतिम सामना अनिर्णित राहिला असला तरी पहिल्या डावातील तब्बल 372 धावांची आघाडी पूर्व विभागाला तब्बल 14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विजेतेपद मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली. कर्णधार ईशान किशनच्या द्विशतकी धमाका, अखेरच्या दिवशी झारखंडच्या अष्टपैलू कौनेन कुरेशीने ठोकलेले पहिलेच प्रथम श्रेणी शतक ही पूर्व विभागाच्या जेतेपदाची वैशिष्टय़े ठरली.
पूर्व विभागाने पहिल्या डावात 708 धावांचा डोंगर उभा केला होता. ईशान किशनच्या तडाखेबंद 270 धावा आणि कुमार पुशाग्रच्या 101 धावांच्या जोरावर ईस्टने दक्षिण विभागाला बॅकफूटवर ढकलले. प्रत्युत्तरात दक्षिण विभागाचा डाव 336 धावांत आटोपला. तिलक वर्माने 99 आणि देवदत्त पडिक्कलने 62 धावा करत झुंज दिली, मात्र पूर्वेची आघाडी कमी करण्यात त्यांना अपयश आले.
गुरुवारी सामना जिंकण्याची शक्यता प्रत्यक्षात संपली असतानाही पूर्व विभागाने फलंदाजी सुरूच ठेवली. पुरेशीने संयमी पण दमदार फलंदाजी करत पहिले प्रथम श्रेणी शतक झळकावले. त्याला अनुपूल रॉयची भक्कम साथ मिळाली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी रचली. अनुपूलनेही (64 धावा) अर्धशतक झळकावले, मात्र दुसऱ्या नव्या चेंडूवर मोहम्मद नधीशच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये देवदत्त पडिक्कलने त्याचा अप्रतिम झेल घेतला. पुरेशी मात्र नाबाद 116 धावांवर राहिला. पूर्व विभागाने 388 धावांवर 7 बाद अशी स्थिती असताना डाव घोषित केला. त्यामुळे दक्षिण विभागासमोर आव्हान उभे करण्याची संधीच उरली नाही. सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पूर्व विभागाने कारकीर्दीत तिसऱ्यांदा दुलीपच्या करंडकाला मिठी मारली.
किशनचा दबदबा कायम
ईशान किशनने 270 आणि 80 धावांची झंझावाती कामगिरी करत ‘सामनावीरा’चा पुरस्कार पटकावला. त्याच्या नेतृत्वाखाली प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पूर्व विभागाचा अपराजित प्रवास आता 16 सामन्यांवर पोहोचला आहे. या दुलीप करंडकातही किशनच सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने पाच डावांत 409 धावा ठोकल्या. त्याची सर्वोच्च खेळी 270 धावांची होती. तिलक वर्मा 266 धावांसह दुसऱ्या, तर पूर्व विभागाचा पुमार पुशाग्र 224 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
14 वर्षांनंतर पुन्हा जल्लोष
पूर्व विभागाने यापूर्वी 2011-1ं2 आणि 2012-13 मध्ये दुलीप करंडक जिंकला होता. 2011-12 मध्ये मध्य विभागाचा डावाने आणि 20 धावांनी पराभव करून पूर्वेने करंडक पटकावला होता. 2012-13 मध्ये अंतिम सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पूर्व विभाग विजेता ठरला होता. आता तब्बल 14 वर्षांनंतर तिसऱ्यांदा पूर्व विभागाने दुलीप करंडकावर जेतेपदाची मोहोर उमटवली. दुलीप करंडकाच्या इतिहासात पश्चिम विभाग सर्वाधिक यशस्वी संघ आहे.
























































