इंजिनीअरिंग प्रवेशासाठी जादा पैसे मागितल्यास कॉलेजवर कारवाई, नियमबाह्य प्रवेशही रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंजूर शुल्कापेक्षा विद्यार्थ्यांकडून अधिक पैसे उकळणाऱया अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) महाविद्यालयांची आता खैर नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी) दिला आहे. अशा महाविद्यालयांमधील नियमबाह्य प्रवेशही तातडीने रद्द केले जाणार आहेत.

अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त व नियमबाह्य शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी पालकवर्ग आणि लोकप्रतिनिधींकडून सीईटी सेलकडे आल्या होत्या. पुण्यातील काही महाविद्यालयांमध्ये पैसे उकळले जात असल्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर सीईटी सेलने कडक पावले उचलली आहेत.

शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त रक्कम घेणे बेकायदेशीर असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. त्यासाठी संबंधित संस्थांनी शुल्क नियामक प्राधिकरणाचा अधिकृत मंजुरी आदेश आपल्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रकाशित करणे बंधनकारक आहे.