Ratnagiri News – देवरुख शहरात रानगवे दाखल; बोटकेवाडीत दोन गवे दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रानगव्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच रानगव्याच्या हल्ल्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता रानगव्यांचा वावर थेट देवरुख शहरात पोहोचल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आले आहेत.

​शुक्रवारी सकाळी देवरुख शहरातील बोटकेवाडी परिसरात एकाच वेळी दोन रानगवे दिसून आले. ऐन सकाळी नागरी वस्तीत गवे घुसल्याची बातमी पसरताच परिसरात मोठी खळबळ उडाली आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ​या गंभीर घटनेची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते शेखर जोगळेकर यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. संगमेश्वर तालुका आणि देवरुख परिसरात रानगव्यांचा वावर दिवसेंदिवस धोकेदायक ठरत असून वनविभागाने तत्काळ यावर ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

​नागरी वस्तीत घुसलेल्या रानगव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाचे विशेष पथक तैनात करावे. ​भविष्यात होणारे हल्ले आणि जीवितहानी टाळण्यासाठी गव्यांना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावावे. देवरुख शहरात व आसपासच्या गावात जनजागृती करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीची पावले उचलावीत.वनविभाग आता यावर काय तातडीची कारवाई करतो, याकडे संपूर्ण देवरुख शहराचे आणि संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.