भिवंडीत ‘मिठाईचा रंग’ उडाला, एफडीएचा दणका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाडक्या बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून मिठाई, पेढे व मोदक खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. भिवंडीच्या बाजारपेठेत असलेल्या मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र दरवर्षी दिसणारी वेगवेगळ्या रंगांची मिठाई यंदा मात्र ‘गायब’ झाली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मिठाईसाठी कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घातली असून तसे आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेशही दिले आहेत. त्याचा चांगलाच धसका मिठाई विक्रेत्यांनी घेतला आहे. मिठाईचा कृत्रिम रंग उडाला असल्याने गणेशभक्तांना आता स्वच्छ व नैसर्गिक पद्धतीने बनवलेलीच मिठाई मिळणार आहे. त्यासाठी खिशाला मात्र काहीशी चाटही बसेल.

सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. यावर्षीही जिलेबी, पेढे, बुंदी, लाडू, चमचम, रसगुल्ला यांसारख्या विविध बंगाली मिठाईला विशेष मागणी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मिठाईला विविध कृत्रिम खाद्यरंगांचा वापर केला जात होता. मात्र खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त किंवा नियमबाह्य रंगांच्या वापराविरोधात एफडीएकडून कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक मिठाई विक्रेत्यांनी कृत्रिम रंगाचा वापर टाळला आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर मिठाई विक्रेत्यांनी चांगलाच धसका घेतला आहे. नियमांचे उल्लंघन करून खाद्यरंग वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी कृत्रिम रंग वापरणे बंद केले आहे.

  • मिठाई विक्रेत्यांनी खाद्यपदार्थांमध्ये केवळ नियमांनुसार परवानगी असलेल्या खाद्यरंगांचाच वापर करावा, तसेच नागरिकांनी अतिशय गडद किंवा भडक रंगाची मिठाई खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
  • सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. आम्ही तुकाराम मुंढे यांच्या कृत्रिम रंग बंदीच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे मिठाई विक्रेते जितू सूचक यांनी सांगितले.

दर्जेदार पदार्थ मिळणार

आमच्या व्यवसायावर काहीही परिणाम झालेला नाही. त्याउलट गुणवत्तेची मिठाई विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा अधिक नफा होणार आहे. ग्राहकांनादेखील चांगले, नैसर्गिक व दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत हाच आमचा प्रयत्न असतो, असेही मिठाई विक्रेत्यांनी सांगितले.