
पर्युषण काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाट्याच्या पदार्थांना बंदी घालणाऱ्या भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेविरोधात मीरा, भाईंदरसह सर्वत्र संतापाची लाट उसळली. शाळा हे विद्येचे माहेरघर असते तिथे शिक्षण द्या. विद्यार्थ्यांवर धार्मिक विचार आणि आहार पद्धती का लादता, असा संतप्त सवाल मराठी एकीकरण समितीने केला. शाळेच्या या तुघलकी फतव्याविरोधात मराठी एकीकरण समितीने शाळेची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली असून त्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेण्यात येणार आहे.
जैनधर्मीयांच्या पर्युषण पर्वाला 16 सप्टेंबरला प्रारंभ होत आहे. या काळात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमी शाळेने अॅपवरून विद्यार्थ्यांना सूचना पत्रक पाठवत पर्युषण काळात डब्यातून कांदा, लसूण, बटाटा व बीट असलेले पदार्थ आणू नयेत अशा सक्त सूचना दिल्या. त्याचबरोबर शाळेच्या कॅण्टीनमध्येही कांदा, लसूण, बटाटा, बीट असलेले पदार्थ मिळणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या डब्यात काय असावे हे आता शाळा ठरवणार काय, असा सवाल ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी थेट सेव्हन स्क्वेअर अॅकॅडमीची मान्यताच रद्द करण्याची मागणी केली.
आमच्या मुलांनी काय खायचे हे नरेंद्र मेहता ठरवणार काय, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ पवार यांनी केला.
टीकेची झोड उठताच नरेंद्र मेहतांचा ‘यू टर्न’
मेहता यांच्या शाळेच्या तुघलकी निर्णयाविरोधात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर आज नरेंद्र मेहता यांनी यू टर्न घेतला. शाळेकडून विद्यार्थ्यांना कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. केवळ पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर पालकांना विनंती करण्यात आली आहे, अशी सारवासारव मेहता यांनी केली.





























































