अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल आयफोन डुओ लाँच, ‘आमचे शिळे अन्न गरम करून वाढताय!’ सॅमसंगचा खोचक टोमणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅपल कंपनीने आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘आयफोन डय़ुओ’ आणि आयफोन 18 प्रो लाँच केला. मात्र यावरून सॅमसंगने ‘आमचे उरलेले जेवण पुन्हा गरम करून झाल्यावर आम्हाला नक्की कळवा!’ असा खोचक टोमणा मारत अ‍ॅपलला पुन्हा एकदा ट्रोल केले आहे.

अ‍ॅपल आणि सॅमसंग हे एकमेकांचे मोठे प्रतिस्पर्धी असून ते एकमेकांना तगडी टक्कर देतात. यावरून अनेकदा त्यांच्यात सोशल मीडियावर ‘वॉर’ रंगलेले पाहायला मिळते. सॅमसंगने 2019 मध्ये पहिला ‘गॅलेक्सी फोल्ड’ लाँच करून फोल्डेबल मार्केटमध्ये आघाडी घेतली. त्यानंतर अ‍ॅपलकडे फोल्डेबल फोन नाही म्हणून सॅमसंग त्यांची सतत खिल्ली उडवत होते. अखेर अ‍ॅपलने 9 सप्टेंबर रोजी ‘सरप्राईज अ‍ॅण्ड शाईन’ इव्हेंटमध्ये पहिला फोल्डेबल स्मार्टफोन ‘आयफोन डय़ुओ’ सादर केला. त्यानंतर सॅमसंगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून पुन्हा एकदा उपरोधिक पोस्ट शेअर करत अ‍ॅपलला डिवचले आहे.

सुरुवातीची किंमत 3 लाख

अ‍ॅपलने पहिला फोल्डेबल फोनसह सहा उपकरणे लाँच केली. आयफोन डय़ुओमध्ये 5.4-इंचचा कव्हर डिस्प्ले आणि 7.6-इंचची मुख्य क्रीन आहे. जो आतापर्यंतच्या आयफोनचा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. आयफोन डय़ुओ हा अ‍ॅपलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन आहे. याची सुरुवातीची किंमत तीन लाख रुपये आहे.

डय़ुओलिंगोचीही एंट्री

‘डय़ुओलिंगो’ अ‍ॅपनेही ‘एक्स’वर केलेल्या पोस्टला रिप्लाय देत सॅमसंगने ‘आय एम सो सॉरी @DuoLingo, त्यांनी आमची कॉपी केली होतीच, आता तुमचीही केली!’ असे म्हटले.