
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी जाण्यास सुरुवात केली असतानाच कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्यांचे प्रमाण वाढल्याने त्याचा ताण संपूर्ण वेळापत्रकावर पडला आहे. मुंबईतून पहाटे 5.50 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव तेजस एक्स्प्रेस गुरुवारी सव्वादोन तास उशिराने रवाना झाली. पुढच्या प्रवासातही गाडीचा जागोजागी अर्धा तास खोळंबा झाला. त्याचा परिणाम उर्वरित गाड्यांवर झाल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
गणेशोत्सवाला अवघे चार दिवस बाकी राहिले असून अनेक चाकरमान्यांनी गुरुवारी गावचा रस्ता धरला. कित्येक चाकरमानी रेल्वेच्या नियमित गाड्यांमधून कोकणच्या दिशेने रवाना झाले. मात्र तेजस एक्स्प्रेस च्या आरामदायी प्रवासासाठी रेल्वे स्थानकात पोहोचलेल्या प्रवाशांना सुरुवातीलाच विलंबाचा मनःस्ताप सहन करावा लागला. तेजस एक्स्प्रेस ची मुंबईतून सुटण्याची निर्धारित वेळ पहाटे 5.50 वाजताची आहे, मात्र गुरुवारी ही गाडी सव्वादोन तास उशिराने म्हणजेच सकाळी 8 वाजता कोकणच्या दिशेने रवाना झाली. एवढय़ा विलंबानंतर पुढील प्रवासात गाडीची वेळ पूर्वपदावर आणली जाईल अशी अपेक्षा प्रवाशांनी होती, मात्र गाडी रडतखडतच धावली. प्रत्येक स्थानकात जवळपास अर्ध्या तासाचा खोळंबा झाल्याने प्रवासी त्रस्त झाले. अजून गणपती स्पेशल गाड्या पूर्ण क्षमतेने धावू लागलेल्या नाहीत. त्याआधीच नियमित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. मग येत्या ‘विकेण्ड’ला गणेशभक्तांना किती तासांच्या विलंबाचा सामना करावा लागणार, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
एकेरी मार्गामुळे गाड्यांची कोंडी
गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या दिवसांत प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून रेल्वेच्या जादा गाड्या सोडल्या जातात. मात्र कोकण रेल्वेचा मार्ग एकेरी असल्याने वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यंदा मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या मिळून 360 हून अधिक जादा गाड्या धावणार आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी चाकरमान्यांची अधिक तास रखडपट्टी होण्याची शक्यता आहे.




























































