
पतीवर स्वतंत्र घर घेण्यासाठी अवाजवी दबाव आणणे आणि कोणत्याही ठोस कारणाशिवाय वारंवार सासर सोडून माहेरी निघून जाणे ही मानसिक क्रूरताच आहे, असा महत्त्वाचा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. या आधारावर कौटुंबिक न्यायालयाने पतीला मंजूर केलेला घटस्फोट उच्च न्यायालयाने कायम ठेवला असून पत्नीची पुनर्याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती पी. टी. आशा आणि न्यायमूर्ती एन. मला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.
पती आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून वृद्धपकाळात त्यांची देखभाल करणे हे त्याचे नैतिक व कायदेशीर कर्तव्य आहे. हे माहीत असतानाही पत्नीने त्याच्यावर वेगळे राहण्यासाठी सतत दबाव आणला. हे वर्तन क्रूरतेच्या व्याख्येत बसते, असे ताशेरे न्यायालयाने आपल्या आदेशात ओढले. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
लग्नानंतर पत्नी सतत क्षुल्लक कारणांवरून माहेरी निघून जायची आणि अनेक महिने तिथेच राहायची. स्वतःचे घर आणि वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी असतानाही पतीने पत्नीच्या हट्टाखातर भाड्याने घर घेतले. इतकेच नव्हे, तर तिच्या सोयीसाठी तिच्या माहेरच्या जवळ घर बदलले. तरीही तिच्या वर्तनात बदल झाला नाही आणि ती वारंवार घर सोडून माहेरी जात राहिली, असा आरोप पीडित पतीने कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत केला. तर दुसरीकडे, पत्नीने हे सर्व आरोप फेटाळून लावत पतीने व सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचा दावा केला. तसेच पतीने पोटगी देण्यापासून वाचण्यासाठी व दुसरे लग्न करण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज केल्याचा आरोप तिने केला.
कौटुंबिक न्यायालयात पुरावे सादर करण्याची आणि उलटतपासणीला सामोरे जाण्याची पुरेशी संधी देऊनही पत्नीने कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत. तसेच पत्नीच्या स्वतःच्या जबाबातच हे स्पष्ट झाले की, पतीने तिच्या इच्छेचा मान ठेवून आधीच वेगळे घर घेतले होते आणि नंतर तिच्या माहेरच्या जवळही तो राहायला गेला होता.
दरम्यान, पती-पत्नीचे नाते हे परस्पर समंजसपणा, तडजोड आणि प्रेमावर आधारित असते. ते केवळ एकाच्या मर्जीने किंवा हुकूमाने चालू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले. तसेच कोणत्याही रास्त कारणाशिवाय वारंवार माहेरी निघून जाण्यामुळे दुसऱ्या जोडीदाराच्या मनात समोरील व्यक्ती कधीही क्षुल्लक कारणावरून भांडण करून सोडून जाईल अशी सतत भीती व मानसिक असुरक्षितता निर्माण होते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या सर्व बाबींचा विचार करता, पत्नीने लावलेले आरोप सिद्ध न झाल्यामुळे आणि तिचे वर्तन मानसिक क्रूरतेचे ठरल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा घटस्फोटाचा निर्णय योग्य ठरवत तिचे पुनर्याचिका फेटाळून लावली.



























































