Crime news – खाणकामाचा ठेका महागात; ठाण्याच्या डॉक्टरला सवादोन कोटींचा गंडा, ओडिशातील 500 कोटींच्या कंत्राटातून चुना लावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील एका कंपनीचा तब्बल ५०० कोटी रुपयांचा खाणकामाचा ठेका मिळवून देण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील डॉक्टरला तब्बल २ कोटी २४ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमोल घुले असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी संजीव आव्हाड आणि शुभम आव्हाड यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅसलमिल परिसरात डॉ. अमोल घुले हे पत्नीसह रुग्णालय चालवतात. तसेच त्यांचे भाऊ डॉ. राहुल घुले यांच्यासोबत ‘कमल लाईफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचा व्यवसाय करतात. त्यांची ओळख संजीव आव्हाड यांच्याशी झाली. त्यानंतर आव्हाड कुटुंबीयांनी घुलेंचा विश्वास संपादन केला. आव्हाड आणि त्यांचा मुलगा शुभम याने घुले बंधूंची भेट घेऊन त्यांचा मोठा व्यवसाय असून ओडिशातील रुंगटा अॅण्ड सन्स प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचा खाणकामाचा ठेका मिळवून देतो असे सांगितले. हा ठेका मिळाल्यास सुमारे १०० कोटी रुपयांचा नफा होईल, असे आमिष दाखवले.

आणखी १६ लाख भरा

ठेका मिळवून देण्यासाठी केंद्रीय खाणकाम मंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवावे लागतील, असे सांगून सुरुवातीला २ कोटी ८ लाख रुपये रोख मागण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानुसार घुले यांनी २ कोटी ८ लाखांची रोकड आव्हाड पिता-पुत्रांकडे दिली. यानंतर पितापुत्रांनी रुंगटा कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर पाठवली. आणखी १६ लाख भरल्यास ठेका मिळेल असे सांगितले. घुले यांनी १६ लाख रुपये भरले. तरीही ठेका मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

भाजप पदाधिकाऱ्याची ग्रामस्थांना रॉड दाखवत दमदाटी

पालघर तालुक्यामधील तिघरे भागात जमीन मोजणीच्या वादातून भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने स्थानिक ग्रामस्थांना चक्क रॉड दाखवत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वप्नील किणी असे पदाधिकाऱ्याचे नाव असून याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उधारीच्या पैशांतून महिलेचा हल्ला; फळ विक्रेत्याचा मृत्यू

उधारीच्या पैशांतून महिलेने भिवंडीत एका फळ विक्रेत्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फळ विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गौरीपाडा परिसरात घडली आहे. मोहम्मद याकूब सिद्दिकी असे मृत फळ विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मीबाई नाईक या महिलेला पोलि सांनी अटक केली.

गौरीपाडा येथे राहणारे मोहम्मद याकूब सिद्दिकी हे जुना ठाणा रोड येथे रस्त्याच्या कडेला हातगाडीवर फळविक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांनी लक्ष्मीबाई या महिलेकडून व्यवसायासाठी काही पैसे उधार घेतले होते. पैसे परत न दिल्याने त्यांच्या हातगाडीवर लक्ष्मीबाई ही महिला पैशांची मागणी करण्यासाठी आली. यावेळी पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की महिलेने फळ विक्रेत्याला बेदम मारहाण केली. यावेळी याकूब हे जमिनीवर कोसळले. याकूब सिद्दिकी यास महिला मारहाण करत असताना शेजारील विक्रेता अब्दुल रौफ त्याच्या मदतीला धावून आला असता महिलेने त्याचा मोबाईल हिसकावून तेथून पळून गेली.

पोलीस कोठडी

मारहाणीत जखमी झालेल्या याकूब यांना स्थानिकांनी उपचारासाठी इंदिरा गांधी स्मृती शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रिक्षेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मारहाण करणाऱ्या लक्ष्मीबाई नाईक या महिलेस अटक केली.