डोंबिवलीच्या गायकवाडवाडीतील गटारे, रस्ते, पायवाटांची बजबजपुरी; रहिवासी, विद्यार्थ्यांचा घाणीतून प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद अरुणोदय शाळेजवळील गायकवाडवाडी परिसरातील गटारे, पायवाटा आणि रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या बजबजपुरीमुळे रहिवासी, विद्यार्थ्यांना घाणीतून प्रवास करावा लागत आहे. पालिका प्रशासन नागरी सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

गायकवाडवाडी परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने परिसरात चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गटारे तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असून नागरिकांना याच घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तुंबलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या परिसरातून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेश विद्यालय आणि भोईर जिमखाना हायस्कूलमधील हजारो विद्यार्थी दररोज ये-जा करतात. शाळकरी मुलांना तसेच त्यांच्या पालकांना खराब रस्ते आणि साचलेल्या घाण पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागते. गायकवाडवाडी हा डोंबिवली शहरातील जुन्या वस्तीचा भाग असून येथे जुन्या चाळींसोबतच नवीन गृहसंकुलेही उभी राहिली आहेत. त्यामुळे परिसरात पादचारी, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र अनेक वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या रस्ते आणि पायवाटांची योग्य देखभाल न झाल्याने त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

प्रशासन, नगरसेवकांचे दुर्लक्ष
गायकवाडवाडीतील रस्ते, गटारे, कचरा, डास प्रतिबंधक फवारणी, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कमानीसह विविध समस्यांबाबत प्रभाग २१ मधील स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, रविना म्हात्रे आणि रेखा म्हात्रे यांच्यासह पालिकेकडे अनेकदा निवेदने दिली. मात्र या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप नितेश गायकवाड यांच्यासह रहिवाशांनी केला.