
खखर्डी एमआयडीसीसाठी खर्डी परिसरातील पाच गावांची जमीन संपादन केली जाणार आहे. मात्र योग्य मोबदला न देताच जमिनी अधिग्रहित केल्या जात असल्याने शेतकरी संतप्त आहेत. ३४ शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबारावर एमआयडीसीचा शिक्का मारल्यावरही त्या जमिनीचा कोणताही मोबदला न देताच एमआयडीसीचे अधिकारी बुधवारी जमीन मोजणीसाठी आले असता बाधित शेतकऱ्यांनी मोबदला द्या व मगच सर्व्हे करा, अशी मागणी करत अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.
३४ शेतकऱ्यांनी एमआयडीसीकडे वारंवार मोबदल्याची मागणी करूनही त्यांना मोबदला दिलेला नाही तरीही अधिकारी जमीन मोजणीसाठी खर्डीत दाखल झाले. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर घरले. शेतकऱ्यांचा रुद्रावतार पाहून मोजणीसाठी आलेले एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मोजणी स्थगित केली. येत्या दोन दिवसांत एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार, पोलीस व बाधित शेतकरी यांची बैठक घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन एमआयडीसीचे नीलेश ठाकरे यांनी यावेळी दिले.
सात वर्षांपासून हेलपाटे
खर्डी एमआयडीसीसाठी २०१९ मध्ये वरस्कोळ, सुगाव, बेंडेकोन, पिंपळपाडा आणि खर्डी येथील ७०६ शेतकऱ्यांची ३१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. मात्र गेल्या ७वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीवर एमआयडीसीचा शिक्का मारूनही संपादित जमिनीचा मोबदला ३४ शेतकऱ्यांना करूनही दिलेला नाही. खरेदीखत करूनही शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. हक्काच्या मोबदल्याची सात वर्षांपासून शेतकरी एमआयडीसीचे हेलपाटे मारत आहेत.
पीक कर्ज मिळेना
शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता त्यांच्या जमिनीवर खर्डी औद्योगिक विकास महामंडळ भूसंपादन अशी नोंद करण्यात आली आहे. ही नोंद शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर झाल्यामुळे सात वर्षांत बाधित शेतकऱ्यांना बँकेकडून कोणतेही पीक कर्ज किवा सेवा सोसायटीचे लाभमिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले.































































