दिल्लीतील १३५५ PG वसतीगृहांच्या सुरक्षेचे सर्वेक्षण, केवळ ३ इमारती धोकादायक; ९ इमारतींना मोठ्या दुरुस्तीची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील PG (पेइंग गेस्ट) इमारतींच्या सुरक्षेबाबत महानगरपालिकेने (MCD) सुरू केलेल्या सर्वेक्षणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १,३५५ PG इमारतींची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तीन इमारती प्रथमदर्शनी धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या तीन इमारतींमध्ये एकूण ६९ जण वास्तव्यास आहेत. याशिवाय नऊ इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची आवश्यकता असल्याचेही सर्वेक्षणात आढळले आहे.

दक्षिण दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली PG वसतीगृह कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. या दुर्घटनेनंतर दिल्लीतील PG तसेच इतर इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर दिल्ली महानगरपालिकेने विविध भागांमध्ये इमारतींची तपासणी करण्याची मोहीम वेगाने सुरू केली आहे.

दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तपासलेल्या १,३५५ इमारतींपैकी १,३०४ PG इमारती प्रथमदर्शनी सुरक्षित आढळल्या आहेत. या इमारतींमध्ये सुमारे २६ हजार ९१७ नागरिक राहत आहेत. तर तीन इमारती प्रथमदर्शनी धोकादायक आढळल्या असून, त्यामध्ये ६९ जण वास्तव्यास आहेत.

दक्षिण विभाग-१ मध्ये तीन धोकादायक इमारती

सर्वेक्षणात आढळलेल्या तीनही धोकादायक इमारती दक्षिण विभाग-१ मध्ये आहेत. या भागातील सर्वेक्षण अद्याप सुरू असल्याने आगामी काळात या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय नऊ PG वसतीगृह इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे आढळले आहे. या इमारतींमध्ये एकूण १४० जण राहत आहेत. त्यापैकी पाच इमारती केशवपुरममध्ये असून, तेथे ३६ जण वास्तव्यास आहेत. नजफगडमध्ये दोन इमारतींमध्ये ३८ जण राहत आहेत. तर दक्षिण विभाग-२ मधील दोन इमारतींमध्ये ६६ जण वास्तव्यास आहेत.

आणखी ३९ इमारतींना किरकोळ दुरुस्तीची गरज

दिल्ली महानगरपालिकेच्या सर्वेक्षणादरम्यान आणखी ३९ PG इमारती अशा आढळल्या, जिथे किरकोळ स्वरूपाच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. या इमारतींमध्ये एकूण ६६४ जण राहत आहेत.

याशिवाय भविष्यात सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील ठरू शकणाऱ्या काही इमारतींचीही ओळख करण्यात आली आहे. सिव्हिल लाइन्समध्ये G+4 पेक्षा अधिक उंचीच्या २१ इमारती आढळल्या असून, त्यामध्ये सुमारे ४२० जण राहत आहेत. शाहदरा दक्षिण विभाग-२ मध्ये अशा ५७ इमारती आढळल्या असून, त्यामध्ये २,०३६ नागरिक वास्तव्यास आहेत.

करोल बागमध्ये अशा सात इमारतींची ओळख झाली असून, त्यामध्ये १०६ जण राहतात. तर शाहदरा दक्षिण विभाग-१ मध्ये पाच आणि नजफगडमध्ये दोन अशा संवेदनशील इमारती आढळल्या आहेत.

चार दिवसांत १११ मालमत्तांवर तोडक कारवाई

सर्वेक्षणाबरोबरच दिल्ली महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईलाही वेग दिला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी सात मालमत्तांवर तोडक कारवाई करण्यात आली. ८ सप्टेंबर रोजी १७, ९ सप्टेंबर रोजी ४६, तर १० सप्टेंबर रोजी ४१ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे चार दिवसांत एकूण १११ मालमत्तांवर तोडक कारवाई करण्यात आली.

याच कालावधीत ८८ मालमत्ता सील करण्यात आल्या. ७ सप्टेंबर रोजी दोन, ८ सप्टेंबर रोजी पाच, ९ सप्टेंबर रोजी २० आणि १० सप्टेंबर रोजी तब्बल ६१ मालमत्ता सील करण्यात आल्या.

अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणात दिल्ली महानगरपालिकेने ९१ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सीलिंग कारवाईशी संबंधित ६९ नोटिसा देण्यात आल्या आहेत. याशिवाय ३४ मालमत्तांविरोधात तोडक कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

सत्य निकेतन दुर्घटनेनंतर कारवाईला वेग

सत्य निकेतनमधील पाच मजली PG इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्ली महानगरपालिकेने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. या दुर्घटनेनंतर राजधानीतील PG म्हणून वापरल्या जाणाऱ्या इमारतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनुसार, राजधानीतील अनेक भागांमध्ये सर्वेक्षणाचे काम अद्याप सुरू आहे. काही भागांतील आकडेवारी प्राथमिक स्वरूपाची आहे. संपूर्ण तपासणी पूर्ण झाल्यानंतर परिस्थितीचे अधिक स्पष्ट चित्र समोर येईल. सध्या धोकादायक किंवा भविष्यात रहिवाशांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकणाऱ्या इमारतींची ओळख करून त्यावर आवश्यक कारवाई करण्यावर दिल्ली महानगरपालिकेचा भर आहे.