उल्हासनगरच्या दोन्ही शासकीय रुग्णालयांतील फायर सेफ्टी यंत्रणा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ९ नवजात बलकांना आपला जीव गमवावा लागला. तर छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलच्या एसीत शॉर्टसर्किट होऊन आगीची भीषण दुर्घटना घडली होती. सुदैवाने तिथे प्राणहानी झाली नाही. पण या दोन्ही घटना घडूनही प्रशासनाला अद्यापि जाग आलेली नाही. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालय व प्रसूतीगृहातील अग्निशमन यंत्रणाच बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा संतप्त सवाल उल्हासनगरवासीयांनी केला आहे. अग्निशमन यंत्रणा ठप्प झाल्याने रुग्ण, डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.

मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अग्निप्रतिबंधक यंत्रणा ही मुख्य मोटार पंप बंद असल्याने पूर्णपणे कार्यान्वित नाही. त्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र दुर्दैवाने येथे आगीची एखादी घटना घडलीच तर आग विझवणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब स्वतः रुग्णालय प्रशासनाने मान्य केली असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितले.

जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा
उल्हासनगरातील शासकीय रुग्णालयाच्या जवळच अग्निशमन दल आहे. शेकडो रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे, पण प्रसूतीगृहासह शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेकडे का दुर्लक्ष झाले, त्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. दरम्यान दोन्ही रुग्णालयांतून अग्निशमन यंत्रणेकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे महानगरप्रमुख दिलीप मिश्रा व शहरप्रमुख शिवाजी जावळे यांनी केली आहे.

  • आठवडाभरापूर्वी काही समाजसेवकांनी हीच बंद पडलेली यंत्रणा रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि स्थानिक खासदारांनी येथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला होता.
  • प्रशासनाने ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास का आणून दिली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश बोंबे यांनी शासकीय प्रसूतीगृहातील पाण्यावर आधारित अग्निशमन यंत्र बंद असल्याची माहिती दिली.