
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरीतील ग्रामीण भागात अंगणवाडी नूतनीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप आणि कोळंबे परिसरातील चार नूतनीकरण केलेल्या अंगणवाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये गोळप मोहल्ला (उर्दू माध्यम) अंगणवाडी, कोळंबे मधील वाकीवाडी, मांडवकरवाडी आणि गोरीवलेवाडी या अंगणवाड्यांचा समावेश आहे.
हा उपक्रम मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन प्रकाश प्रल्हाद छाब्रिया यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.या अंगणवाड्यांमध्ये इमारतीची आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण, आकर्षक रंगकाम, बालकांना ज्ञानवर्धक माहिती देणाऱ्या बोलक्या भिंती तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ, आनंददायी आणि शिक्षणास पोषक वातावरण मिळणार आहे. यासोबतच गोळप दाभिळवाडी आणि कोळंबे बागवाडी येथील आणखी दोन अंगणवाड्यांचे नूतनीकरणाचे काम तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे.
रत्नागिरी परिसरात या उपक्रमाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांत आतापर्यंत एकूण 17 अंगणवाड्यांचे नूतनीकरण पूर्ण करण्यात आले असून त्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वी फणसोप, रनपार, गोळप, पावस आणि कोळंबे परिसरातील 13 अंगणवाड्यांचे नूतनीकरण करून त्या बालकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
रितू प्रकाश छाब्रिया यांच्या नेतृत्वाखाली मुकुल माधव फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत आहे. समाजातील विविध घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. अंगणवाडी नूतनीकरण प्रकल्प हा फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वपूर्ण भाग असून, स्थानिक समुदाय आणि पालकांकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास आकाशवाणी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे स्टेशन डायरेक्टर डॉ. सुनील गायकवाड, कार्यक्रम अधिकारी विवेक वानखेडे,सुहास नंदुरे आकाशवाणी रत्नागिरी बाल विकास प्रकल्प अधिकारी केदार चव्हाण व संदीप पाटील, ॲड. गौरव महाजनी व ॲड. रुची महाजनी,तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे रामबाबू संका, सागर चिवटे, नंदकुमार शिंपी, अमित घोरपडे, आशिष आठवले तसेच स्थानिक सरपंच, अंगणवाडी सेविका, पालक, ग्रामस्थ तसेच मुकुल माधव फाऊंडेशनचे शुभम भेगडे, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.





























































