
MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची विद्यार्थ्यांसोबत भेट घेतली. MPSC च्या अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा द्यावा आणि पेपरफुटीची न्यायालयीन चौकशी करावी अशा मागण्या केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच या मागण्या जर मान्य नाही झाल्या विद्यार्थी मुंबईत आंदोलन करतील असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. उत्स्फुर्तपणे सुरु असलेल्या या आंदोलनांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे. MPSC चे चेअरमन आणि सचिव यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी विद्यार्थ्यांची जी पहिली मागणी होती. काल मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली पण ही मागणी त्यांनी ऐकलीच नाही. हे माझ्या अधिकारात नाही बसत असे म्हणून त्यांनी हा विषय पुढे ढकलला. या प्रकरणी SIT नव्हे तर न्यायालयीन चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. याचबाबत आम्ही राज्यपालांची भेट घेतली होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
तसेच प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात MPSC विद्यार्थ्यांचे मोर्चे वाढत आहेत. दुर्दैवाने धाराशिवमध्ये एका तरुणाने आत्महत्या केली. हे सर्व सुरू असताना राज्य सरकारकडून आम्हाला उत्तरं हवी आहेत. प्रथम सरकारने काही बदल सुचवले आहे. पण आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिवपदी हेच लोकं असतील तर हे बदल होतील का? याबाबत SIT सोबत न्यायायलयीन चौकशीही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि यात जे कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या मागण्या विद्यार्थ्यांच्या होत्या आणि त्या मागण्या आम्ही राज्यपालांकडे मांडल्या. राज्यपालांनीही यात लक्ष घालू असे आश्वासन दिले आहे. जर MPSC च्या अध्यक्षांनी राजीनामा नाही दिला तर जिल्ह्याजिल्ह्यांतून विद्यार्थी मुंबईत येतील आणि या विरोधात आंदोलन करतील, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.






























































