विद्यानंद बापट इफेक्ट – सोसायटीत डीजेचा दणदणाट केला तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई; अंबरनाथ, सहकारी सहाय्यकण निबंधकांचा इशारा परिपत्रक जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंबरनाथ, बदलापुरात आता गणेशोत्सवात सोसायटीच्या आवारात डीजेचा अतिवापर आणि कानठळ्या बसवणारा आवाज खपवून घेतला जाणार नाही. सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवला आणि आवाजाची मर्यादा ओलांडली तर आता थेट सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीस जबाबदार धरले जाईल, असा सक्त इशारा अंबरनाथ तालुक्याचे सहाय्यक निबंधक राजेंद्र मरकड यांनी दिला आहे. सहाय्यक निबंधक कार्यालयाने अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीसाठी त्याबाबत एक परिपत्रकच जारी केले आहे.

डीजे आणि डॉल्बीच्या दणदणाटावरून पुण्यात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आवाज उठवत लढा उभारला. त्याचा थेट इफेक्ट अंबरनाथ बदलापुरात झाला आहे. गणेशोत्सव काळात लोसायटीच्या आवारात केल्या जाणाऱ्या डीजेच्या अनिर्बंध वापराला चाप लावला आहे. गृहनिर्माण संस्था हा निवासी परिसर असल्याने तिथे आवाजाची मर्यादा ही ४५ डेसिबलपेक्षा कमी ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीही मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेचे डीजे आणि ध्वनिक्षेपक सर्रास वापरले जातात. त्याचा भयंकर त्रास लहान मुले, विद्यार्थी, उच्च दाब व हृदयरोगाच्या रुग्णांना होतो, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयाने जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

डीजेच्या या मर्यादेपेक्षा जास्त वाजणाऱ्या आवाजांवर सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने काटेकोर लक्ष ठेवून नियमांचे पालन करावे, नियमभंग केल्यास थेट सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व संपूर्ण व्यवस्थापन समितीस जबाबदार धरून कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा सहाय्यक निबंधक कार्यालयाने दिला आहे.

मोखाड्यात डीजे आणि लेजर लाईटला बंदी

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी व पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मोखाडा पोलिसांनी मिरवणुकीत डीजे आणि लेजर लाईट लावण्यास बंदी घातली आहे. त्याबाबतच्या सूचना सार्वजनिक गणेश मंडळांना दिल्या आहेत. आदिवासी भागात गणेशोत्सव हा पूर्वापार टाळ, मृदुंग आणि भजनाच्या गजरात साजरा केला जात होता. मात्र अलीकडच्या काळात सर्वत्र डीजे आणि लेजर लाईटचे स्तोम माजले आहे. मात्र आठवडाभरापासून राज्यात डीजेच्या वापरावर अनेक शहरांमध्ये बंदी घातली जात आहे. त्यामुळे मोखाड्यातही डीजे, लेजर लाईटवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील ११८ सार्वजनिक गणेश मंडळांना लेखी तसेच तोंडी सूचना दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळेंनी दिली आहे.