काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विश्वेषक रत्नाकर महाजन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजकीय विश्वेषक रत्नाकर महाजन यांचे निधन झाले आहे. पुण्यातील राहत्या घरी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी दुपारी एक वाजता पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष, ‘लोकप्रबोधिनी’ चे अध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. महाजन यांनी आयुष्यभर पुरोगामी विचारांचा पुरस्कार केला आणि आपल्या विचारांशी ते सदैव एकनिष्ठ राहिले. अत्यंत संयत आणि व्यासंगी मांडणीसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनामुळे महाजन कुटुंबावर कोसळलेल्या अपार दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे एक्स पोस्टमध्ये म्हणाल्या.

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि प्रगल्भ विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. अभ्यासू आणि समाजवादी चळवळीशी जोडलं गेलेलं तत्त्वनिष्ठ व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. प्रवक्ते म्हणून कोणतीही आगपाखड न करता संयत शब्दांत काँग्रेस पक्षाची बाजू माध्यमांमध्ये मांडण्याची त्यांची अत्यंत प्रभावी शैली होती. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी केलेलं काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले.