
‘संघर्ष हे मराठवाडय़ाचे प्राक्तन आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात विकास योजनांचा महापूर आला. प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य! लोकांनी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सत्तेत बसवले, पण सत्ता चालवण्यासाठी तुम्ही नालायक ठरलात. मनोज जरांगे पाटील हे तेरा दिवसांपासून उपोषण करत आहेत, पण सरकारच्या संवेदनाच मेल्या आहेत. नुसत्या संवेदनाच मेल्या नाहीत, तर हे सरकारच मेले असून दिसतोय तो फक्त सांगाडा…’ असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला.
नांदेड येथे शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि आमदार अंबादास दानवे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकासाच्या दाव्याची पोलखोल केली. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घोषणांचा पाऊस पाडून टाळ्या मिळवल्या. पण यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात उतरली नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावेळी संपर्कप्रमुख बबनराव थोरात, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार प्रवीण स्वामी, लोकसभा संपर्कप्रमुख किशोर पोतदार, विधानसभा संपर्कप्रमुख सचिन चऱ्हाटे पाटील, महापौर सय्यद इक्बाल, महानगरप्रमुख प्रकाश मारावार, मनोज यादव, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी मोठय़ा संख्याने उपस्थित होते.
हेलिकॉप्टरचा कारखाना कुठे गेला?
दावोसहून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नांदेडला हेलिकॉप्टरच्या सुटय़ा भागांचा कारखाना सुरू करण्याची घोषणा केली. साडेपाच हजार कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले असेही सांगतात. पण मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांमध्ये मतभेद असल्यामुळे पुढे या कारखान्याचे काय झाले हे कळायला मार्ग नाही. हेलिकॉप्टर सोडा, निदान सायकलच्या सुटय़ा भागांचा कारखानाही सुरू केला असता तर या भागातील तरुणांना रोजगार मिळाला असता, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. आमदार खरेदीसाठी यांच्याकडे पैसा आहे, पण रोजगार निर्मितीसाठी नाही, असेही ते म्हणाले.































































