पाच दिवसांचा आठवडा करा… बँक कर्मचारी, अधिकारी संपामुळे सेवा कोलमडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामकाजाचा पाच दिवसांचा आठवडा करा, कामगिरी आधारित प्रोत्साहन योजनेचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करा, या प्रमुख मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पुकारलेल्या बँकांच्या संपाला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील 60 हजारांहून अधिक बँक कर्मचारी, अधिकारी या संपात सहभागी झाले. मुंबईत आझाद मैदानात झालेल्या मोर्चातदेखील कर्मचाऱयांची एकजूट दिसली.

बँक कर्मचाऱयांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यातील जवळपास सर्व बँक शाखा बंद राहिल्या. त्यामुळे विविध कामानिमित्त बँकेत जाणाऱया ग्राहकांना फटका बसला. महाराष्ट्रभर 25 हून अधिक केंद्रांवर रॅली आणि निदर्शने करण्यात आली.  बँकिंग कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करा. आमच्या हक्क आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असेल तर बँक कर्मचारी शांत बसणार नाहीत, असा इशारा कर्मचाऱयांनी दिला.

तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार

बँक कर्मचाऱयांनी दाखविलेली एकजूट आणि एकात्मता पुढेही अधिक मजबूत केली जाईल, जोपर्यंत कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांची समाधानकारक पूर्तता होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यूएफबीयू महाराष्ट्राचे संयोजक कॉम्रेड एन. शंकर यांनी व्यक्त केला.