
माजी महापौर विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केल्याच्या मुद्दय़ावरून माजी आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीतील कुणबी समाजाच्या भवितव्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘कोकणातील कुणबी समाज संपवून टाकण्याचे षड्यंत्र तर नाही ना?’ अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाडय़ात कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी शिबिरे घेतली जात असताना कोकणात मात्र कुणबींची प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे. हा केवळ जात प्रमाणपत्राच्या वैधतेचा प्रश्न नसून कोकणातील कुणबी समाजाच्या अस्तित्व, ओळख आणि संधींचा प्रश्न आहे, असे कपिल पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.
विशाखा राऊत या मूळच्या पालघर जिह्यातील आहेत. मुंबईत स्थलांतर झाल्यामुळे त्यांची पालघरमधील सामाजिक ओळख नाकारता येणार नाही. विशाखा राऊत यांच्या राजकीय पक्षाशी या प्रश्नाचा संबंध नसून कुणबी समाजाच्या जात ओळखीचा मुद्दा स्वतंत्रपणे पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणी किंवा तिलोरी कुणबी समाजाची स्वतंत्र सामाजिक ओळख आहे. रायगड आणि रत्नागिरीतील कुणबी समाज मोठय़ा प्रमाणावर जमिनीपासून वंचित झाला असून त्यांच्याकडे शिक्षण आणि आर्थिक साधनांचा अभाव आहे. पालघरमधील कुणबी समाजाच्या जमिनी आणि जागाही विविध प्रकल्पांमुळे धोक्यात येत आहेत. ओबीसींमधील अतिमागास समूहांचे अस्तित्व आणि ओळख धोक्यात येऊ नये यासाठी सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

























































