
जत तालुक्यातील माडग्याळ येथील प्रसिद्ध शेळ्या-मेंढय़ांच्या बाजारासाठी तामीळनाडूहून आलेल्या व्यापाऱ्यांना भिवर्गी फाट्याजवळ अडवून लुटल्याची घटना घडली होती. स्कॉर्पिओमधून आलेल्या 8 ते 10 जणांच्या सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तूल आणि घातक शस्त्रांचा धाक दाखवून 25 लाख रुपयांची रोकड व दीड तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज पळवून नेला होता. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे.
माडग्याळ येथे शुक्रवारी भरणाऱ्या शेळ्या-मेंढय़ांच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूतून व्यापारी येतात. बाजारासाठी शुक्रवारी पहाटे तामीळनाडूतील सेलम येथून काही व्यापारी बाराचाकी ट्रकमधून येत होते. त्यांचे वाहन जत तालुक्यातील भिवर्गी फाट्याजवळ आले असता, पाठीमागून आलेल्या स्कॉर्पिओ वाहनाने त्यांच्या ट्रकचा पाठलाग केला. दरोडेखोरांनी पुढे येऊन ट्रकच्या समोर आपली गाडी आडवी घालत ट्रक थांबवला. तोंडाला रुमाल बांधलेल्या 8 ते 10 दरोडेखोरांनी ट्रकमध्ये चढून जबरदस्तीने 25 लाख रुपयांची रोकड आणि दीड तोळे सोन्याचे दागिने लुटले.
या घटनेची माहिती मिळताच, उमदी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथकही घटनास्थळावर दाखल झाले असून, गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी श्वान पथक आणि ठसेतज्ञांची मदत घेण्यात आली आहे.
दरोडा पडला पहाटे, गुन्हा रात्री दाखल
शुक्रवारी पहाटे दरोडय़ाची घटना घडली. माहिती मिळताच, उमदी पोलीस काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनीही घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक आणि ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांची यंत्रणा तत्परतेने कामाला लागली असतानाही, प्रत्यक्ष रात्री 9 वाजले तरी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
पूर्वनियोजित कटाचा संशय
पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे. दरोडेखोरांकडे तामीळनाडूच्या व्यापाऱ्यांकडे रोख रक्कम असल्याची माहिती कशी होती? त्यांना कुणी टीप दिली होती का किंवा यामागे एखादा पूर्वनियोजित कट होता का? याबद्दल पोलीस कसून तपास करत आहेत.

























































