Chandrapur news – गुप्तधनासाठी अघोरी पूजा; मांत्रिकासह 9 जणांना अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलिसांनी मध्यरात्री निर्जन शिवारात गुप्तधनासाठी अघोरी विधी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. कोलगाव-विसापूर मार्गावर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका चारचाकी वाहनाचा (एमएच 40-सीएक्स 4616) माग काढत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या प्रकरणी एका महिलेसह मांत्रिकाला आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना अशा एकूण 9 जणांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे, तर यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास विसापूर पोलीस चौकीला एका संशयित वाहनाबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहनाची पाहणी केली. पोलिसांना वाहनातील प्रवाशांच्या संशयास्पद हालचालींवरून शंका आल्याने त्यांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवून चौकशी केली असता गुप्तधनासाठी अघोरी विधी रचला जात असल्याचे उघडकीस आले.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी देवागन सहारे याने गुप्तधन मिळवण्याच्या लालसेने या सर्व आरोपींना एकत्र आणले होते. रामपूर येथील शांताराम हिंगणे याच्या शेतात गुप्तधन असल्याचा दावा करण्यात आला होता, जिथे हा अघोरी प्रकार घडणार होता. या कामासाठी श्यामराव आत्राम हा मांत्रिक म्हणून विधी करणार होता, तर उर्वरित आरोपींवर खड्डा खोदणे आणि पूजेचे साहित्य जमवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे.