वहिनीसोबतच्या अनैतिक संबंध असल्याचा संशय ; 22 वर्षीय तरुणाची 17 वेळा वार करून हत्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व दिल्लीतील मंडावली परिसरात एका 22 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विवाहित वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून केशव कुमार (२२) या तरुणाने आपल्या साथीदाराच्या मदतीने वंश डेढा (२२) याच्यावर धारदार शस्त्राने 17 वेळा वार केले. गुरुवारी संध्याकाळी ज्ञान वाटिका शाळेजवळ ही थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव कुमार याने वंशाचा पाठलाग करून अत्यंत निर्दयीपणे त्याच्या शरीरावर 17 वेळा वार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वंशाला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरूण वंश हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता कर्ता होता. ११ वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याने १२ वीनंतर शिक्षण सोडले आणि आई, लहान भाऊ तसेच तीन बहिणींच्या उदरनिर्वाहासाठी काम करण्यास सुरुवात केली होती. तोच आपल्या बहिणींच्या शिक्षणाचा आणि मोठ्या बहिणीच्या लग्नाचा खर्च उचलत होता.

मंडावली पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे कसून चौकशी सुरू आहे. या हत्येमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणात फरार असलेल्या दुसऱ्या आरोपीची ओळख पटली असून, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीकडून खुनात वापरलेली सुरी, कपडे आणि मोटरसायकल जप्त केली आहे.सर्व बाजूंचा सखोल तपास करून लवकरात लवकर कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.