
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा उद्घाटनाला आपण येणार नाही, कारण मला माझीच लाज वाटतेय इतका उशीर झालाय, असे ते म्हणाले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य केले. वाहतूक कोंडीमुळे कार्यक्रमात पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी स्वतःलाच या स्थितीसाठी जबाबदार धरले आणि हा आपल्याच जुन्या चुकांचा फटका असल्याचे मान्य केले.
मुंबईत आयोजित 22 व्या इंडो-अमेरिकन कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळ्यात नितीन गडकरी सहभागी होणार होते. मात्र या कार्यक्रमला पोहचण्यासाठी त्यांनी तब्बल 1 तास उशीर झाला. याबाबतचे स्पष्टीकरणही त्यांनी भाषणादरम्यान दिले. वरळीपासून या हॉटेलपर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीत मी अडकलो होतो. त्यामुळे मला या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी उशीर झाला. पण खरं तर, मी माझ्या चुकीचीच किंमत मोजत आहे, असे यावेळी गडकरी म्हणाले.
आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत गडकरींनी 1992-2000 या कालावधीत 55 उड्डाणपूल, वांद्रे -वरळी सी लिंक आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवे यांसारख्या प्रकल्पांचे काम केल्याचे सांगितले. त्या काळातील परिस्थितीनुसार हे प्रकल्प महत्त्वाचे होते, परंतु वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे आणि जुन्या तंत्रज्ञानामुळे आता वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. जुने उड्डाणपूल बदलून आता आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शहरांमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी त्यांनी मल्टि-लेव्हल उड्डाणपुल तयार करण्याचा पर्याय सुचवला. मलेशियाकडून हिंदुस्थानला मिळालेल्या नवीन तंत्रज्ञानाचा संदर्भ देत त्यांनी एकाच खांबावर (पिलर) अनेक स्तरांचे उड्डाणपूल आणि त्याच्या सर्वात वरच्या पातळीवर मेट्रो मार्ग उभारणे शक्य असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांमुळे शहरी भागातील वाहतूक अधिक सुलभ आणि टिकाऊ होऊ शकते, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
गडकरीसाहेबांना लाज वाटतेय! मुंबई-गोवा महामार्ग अजूनही अपुराच






















































