
गणेशोत्सवात बारा दिवसांपैकी चार दिवस सकाळी ६ ते मध्यरात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे १५, १८, १९ सप्टेंबर आणि २५ तारखेला अनंत चतुर्दशी या दिवसांत मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार आहे.
गणेशोत्सव सोमवारी १४ सप्टेंबरपासून २५ सप्टेंबरपर्यंत असा बारा दिवस साजरा होणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ध्वनिप्रदूषण नियमानुसार २०२६ या वर्षातील एकूण पंधरा विशेष दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्यास राखीव ठेवले आहेत. त्यातील गणेशोत्सवातील १५, १८, १९ सप्टेंबर आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी दिली आहे. ही विशेष सवलत देताना ध्वनीची निर्धारित मर्यादा कायम ठेवण्याची अट घालण्यात आली आहे.
तीन दिवस प्रशासनाच्या खिशात
१५ विशेष दिवसांपैकी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजवण्याचे बारा दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्यापैकी चार दिवस गणेशोत्सवातील आहेत. उर्वरित तीन दिवसांबाबतचा निर्णय हा पोलिसांशी चर्चा करून घेतला जाणार आहे. त्यामुळे वर्षभरात ध्वनिक्षेपकांना अधिक मुभा मिळणारे ते कोणते तीन दिवस आहेत याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

























































