
देशाचे गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावरुन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर टीका केली आहे. अमित शहा जेव्हा मुंबईत असतात. तेव्हा त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा ताण मोठ्या प्रमाणांमध्ये मुंबई पोलिसांवर पडतो आणि त्याचा दुष्परिणाम मुंबईकर जनतेला भोगावा लागतो. त्यामुळे अमित शहा यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून गणेशोत्सवाच्या काळामध्ये इथे येणं थोडं कमी केलं पाहिजे. त्याचा फायदा जनतेला होईल असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.
अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत, ही काही मोठी किंवा आश्चर्यकारक बातमी नाही असा टोला लगावत संजय राऊत म्हणाले की, अलीकडच्या काळात, विशेषतः दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन झाल्यापासून ते दिल्लीत फारसे नसतात आणि शक्यतो मुंबईतच असतात. जेव्हा ते मुंबईत असतात, तेव्हा त्यांच्या कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मुंबई पोलिसांवर अतिरिक्त ताण येतो. सध्या मुंबईत गणेशोत्सव सुरू असून रस्त्यारस्त्यावरती मंडपांची गर्दी आहे, बाप्पाच्या मूर्तींचे आगमन आहे तसेच नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. अशातच गृहमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस दलाचा अर्धा फौजफाटा त्यांच्या सेवेत लावला जातो. सुरक्षेच्या नावाखाली रस्ते बंद केले जातात आणि ते बाहेर पडल्यावर आणखी दहा रस्ते बंद केले जातात, ज्याचा नाहक भुर्दंड सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले. गृहमंत्र्यांचे मुख्य कार्यक्षेत्र दिल्लीत बसून काम करण्याचे आहे, परंतु त्यांना जर दिल्लीत बसून वेळ जात नसेल किंवा दिल्लीत जेन्झींची भीती वाटत असेल, तर त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांची तीव्र गरज असलेल्या मणिपूरला गेले पाहिजे, असे सांगत राऊतांनी आठवण करून दिली की, देशाचे गृहमंत्री गेल्या अनेक दिवसांपासून मणिपूरला गेलेले नाहीत. याशिवाय आसामसह इतरही अनेक राज्यांची कायदा व सुव्यवस्था धोक्यात असून तिथेही गृहमंत्री गेले पाहिजेत, असा टोमणा संजय राऊत यांनी मारला.
मुंबईमध्ये ते यासाठी येतात मुंबईत त्यांना पैसे देणारे आणि फंड कलेक्शन करणारे लोक आहेत, तसेच मोठ्या प्रमाणावर हजारो थैल्या मुंबईत आहेत. बिल्डर आणि जमिनीचे व्यवहार करणारे लोक ज्यांच्या जीवावर भाजप तुम्हाला सरावलेला दिसतो आणि महानगरपालिकेतून फंड कलेक्शन मोठ्या प्रमाणात होणार. त्याच्यामुळे ते इथे रमतात. एकेकाळी अमित शहा शेअर बाजारात काम करत होते आणि अमित शहा शेअर बाजार आहेत, तरी त्यांनी देशाचे गृहमंत्री म्हणून गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येणे टाळावे, जेणेकरून जनतेला त्याचा फायदा होईल, असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, मुंबई हे अत्यंत गजबजलेले शहर असून येथील लोकांना रोजच्या कामासाठी सतत बाहेर पडावे लागते, असे सांगत राऊतांनी अमित शहांना एक उपरोधिक सल्ला दिला. त्यांनी एकाच गाडीने किंवा एकट्याने मुंबईत फिरावे, त्यांना कोणीही हात लावणार नाही आणि मुंबईची ही हमी मी घेतो, असे आव्हान देत ते म्हणाले की, आम्ही मुंबईकर ही गॅरंटी द्यायला तयार आहोत. मुंबईतील माणसे फार पाप धरू आहेत आणि तुम्ही असे कोणतेही महान राष्ट्रकार्य केलेले नाही, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय शक्ती तुमच्या जिवावर उठतील, अशी खरमरीत टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.























































